हिंद देश के निवासी सब जन एक हैं, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक हैं..  पं. विनयचन्द्र मौद्गल्य यांनी लिहिलेल्या या देशभक्तीपर गीतात विविधतेने नटलेल्या या देशात कशी एकता नांदते याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दूरदर्शन पाहात मोठय़ा झालेल्या अनेक पिढय़ांना याच प्रकारे एकतेचे महत्त्व पटवू दिले होते ‘एक अनेक एकता’ या गाजलेल्या अ‍ॅनिमेशनपटाने. याचे दिग्दर्शक होते भीमसेन खुराना. पण चित्रपट व्यवसायात पुढे ते भीमसेन याच नावाने ओळखले गेले.

साधारण ५० च्या दशकात विख्यात ‘डिस्ने स्टुडिअो’मधील तज्ज्ञ क्लेअर वीक्स यांना भारतात बोलावले गेले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे ‘बनयान डिअर’ हा या तंत्रज्ञानावरील पहिला लघुपट भारतात बनला. व्ही. जी. सामंत, भीमसेन आणि राम मोहन हे त्या काळी अ‍ॅनिमेशनचे तंत्र जाणून घेणारे पहिल्या पिढीतील तरुण. भीमसेन यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या मुलतानमध्ये १९३६ मध्ये झाला. फाळणीनंतर ते लखनऊला आले. चित्रकला व संगीताची त्यांना कमालीची आवड. परदेशातून आलेले अ‍ॅनिमेशन चित्रपट पाहणे हा त्यांचा आवडता छंद. याच छंदापायी ६० च्या दशकात ते मुंबईत आले. ‘द क्लाइंब’ हा पहिला अ‍ॅनिमेशन लघुपट बनवला. शिकागो चित्रपट महोत्सवात त्याला सिल्व्हर ह्य़ूगो पुरस्कारही मिळाला. आज संगणकाच्या वापराने या अ‍ॅनिमेशनचं जग अधिकच विस्तारलं,  पण त्या काळात याला फार महत्त्व दिले जात नव्हते, पण भविष्यकाळ हा अ‍ॅनिमेशन तंत्राचाच राहणार हे भीमसेन यांनी तेव्हाच ओळखले होते. ‘एक अकेला इस शहर में..’ किंवा ‘दो दीवाने शहर में..’ ही गाणी आणि गुलजारसारख्या संवेदनशील साहित्यिकाची पटकथा असलेल्या ‘घरोंदा’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शनही भीमसेन यांनीच केले होते. नंतरही त्यांनी ‘दूरियाँ’ हा चित्रपट व दूरदर्शनसाठी मालिका बनवल्या. भारतातील नामवंत १३ मध्यमवयीन चित्रकारांची माहिती त्यांनी चित्रवाणीच्या माध्यमातून जगापुढे आणली हे त्यांचे ज्ञानलक्ष्यी कामही महत्त्वाचे मानले जाते. ‘लोकगाथा’ या नावाने त्यांनी बनवलेल्या मालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आज छोटा भीम, डोरेमॉन आणि शिनचॅन ही अ‍ॅनिमेटेड पात्रं मुलांच्या भावविश्वाचा भाग बनून गेलीत. याचे श्रेय भीमसेनजींसारख्या अवलिया कलाकारांचे आहे. लघुपट, माहितीपट, दूरदर्शन मालिका, अ‍ॅनिमेशन, जाहिरात अशा विविध कला क्षेत्रांत त्यांनी मुशाफिरी केली.  अशा या बहुपेडी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांच्या निधनाने अ‍ॅनिमेशन विश्वाचे अपरिमित नुकसान झाले आहे.