X

सत्या त्रिपाठी

आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अनेक भारतीयांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अनेक भारतीयांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक शिखर संघटनेत महत्त्वाच्या पदांवरही अनेक भारतीय कार्यरत आहेत. सत्या एस. त्रिपाठी हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तींमधील एक. अर्थतज्ज्ञ असलेल्या त्रिपाठी यांच्यावर संयुक्त राष्ट्रांचे सहसरचिटणीस व संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते आता इलॉट हॅरिस यांची जागा घेतील. त्रिपाठी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्रांचे विकासविषयक पायाभूत धोरण ठरविण्याबाबतची जबाबदारी होती.

त्रिपाठी यांची शैक्षणिक कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. कटकच्या रेवेन शॉ महाविद्यालयात १९७१-७२ मध्ये त्यांनी गणित व इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. याच विद्यापीठातून वाणिज्य, गणित, अर्थशास्त्र व वित्त या विषयांत पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. १९७९ ते ८२ या कालावधीत ओदिशातील बेहरामपूर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. पुढे याच विद्यापीठातून ते द्विपदवीधर झाले. कायदेविषयक अभ्यासात त्यांनी प्रावीण्य मिळवले. पीएचडीसाठी ‘आंतरराष्ट्रीय कायदे’ या विषयावर त्यांनी प्रतिष्ठेच्या अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला. विविध विषयांत पारंगत अशा त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने संयुक्त राष्ट्रांमध्ये छाप पाडली आहे. गेली ३५ वर्षे ते संयुक्त राष्ट्रांशी संबंधित आहेत. विकासवादी अर्थतज्ज्ञ व वकील असलेल्या त्रिपाठींनी आशिया व आफ्रिका खंडांत टिकाऊ विकासाचे प्रारूप, मानवी हक्क, लोकशाहीवादी सरकार व कायदेविषयक बाबींवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यापूर्वी त्रिपाठी यांनी विकसनशील देशांमधील वनांच्या घटत्या प्रमाणाला आळा घालणे तसेच कार्बन उत्सर्जन रोखणे या महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाचे संचालक आणि कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. याखेरीज अ‍ॅच आणि नियास येथे त्सुनामीनंतरची स्थिती तसेच संघर्षांनंतरच्या उभारणीत संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक म्हणून महत्त्वाचे योगदान दिले आहे. १९९८ पासून त्रिपाठी यांनी युरोप, आशिया व आफ्रिका खंडांत वातावरण बदलांमुळे होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती केली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून विविध देशांना प्रगतीसाठी मदत करणे तसेच समन्वय राखण्याचे काम ते करीत आहेत. जगात शांतता नांदावी तसेच जनतेच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा निर्धार याच्या जोरावर त्रिपाठी ही नवी जबाबदारी समर्थपणे पेलतील अशी अपेक्षा आहे.