13 July 2020

News Flash

पवन सुखदेव

खरे तर ते व्यवसायाने बँकर. डॉइश बँकेत ते व्यवस्थापकीय संचालक होते.

‘पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञच असायची गरज नसते. एखाद्या शेतक ऱ्याला विचारा की पिकांच्या चांगल्या वाढीसाठी मधमाश्यांची पोळी भाडय़ाने घेण्यासाठी तो किती पैसे मोजतो, कारण आता निसर्गात पुरेशा मधमाश्याच नाहीत. त्यामुळे परागीभवन कमी होते व पिकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. पण मधमाश्या काही त्यांच्या या कामासाठी निविदा तर काढत नसतात, त्यामुळे त्यांच्या कामाचे मूल्य समजत नाही,’ हे निरीक्षण नोंदवले आहे पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांनी. ‘सामान्यांचे पर्यावरणतज्ज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सुखदेव यांना अलीकडेच, पर्यावरण क्षेत्रातले नोबेल मानला जाणारा ‘टायलर पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

खरे तर ते व्यवसायाने बँकर. डॉइश बँकेत ते व्यवस्थापकीय संचालक होते. ‘पर्यावरणातील कुठल्याही क्रियेचे आर्थिक मूल्य असते, झाडांनी वातावरणात सोडलेल्या ऑक्सिजनची किंमत असते’ हा विचार त्यांनी मांडला. २००८ पासून ते पर्यावरणतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. सुखदेव यांनी ‘द इकॉनॉमिक्स ऑफ इकोसिस्टीम्स अँड बायोडायव्हर्सिटी’ हा संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या वतीने सादर केला जाणारा पहिला अहवाल लिहिला होता. त्यात त्यांनी निसर्गाचे आपण किती देणे लागतो याचा ताळेबंद बँकर या नात्याने मांडला होता. निसर्ग भांडवलाची आर्थिक किंमत त्यांनी पहिल्यांदा सांगितली व हरित अर्थशास्त्राच्या माध्यमातून रोजगार कसे निर्माण होतात व दारिद्रय़ निर्मूलनकसे करता येते हे दाखवून दिले.

जन्माने दिल्लीकर असलेल्या सुखदेव यांनी एका मुलाखतीत आरेच्या जंगलाची जागा कारशेडला दिल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. ब्राझील व ऑस्ट्रेलियातील वणव्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मते जमीन हिसकावण्याचे हे प्रकार भारतासह अनेक देशांत होतात, त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळत असतो. अ‍ॅमेझॉनची जंगले ही लॅटिन अमेरिकेच्या २४० अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, पण त्याबदल्यात उरुग्वे, पॅराग्वे, अर्जेटिना, ब्राझील यांसारखे देश निसर्गाला कुठली भरपाई देतात, असा रोकडा सवाल ते करतात. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवे थांबले नाहीत तर पाऊस संपून शेतीची माती होईल हे लोकांना समजत नसेल तर कठीण आहे, असे त्यांचे निरीक्षण.

त्यांना मिळणारा टायलर पुरस्कार हा दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून दिवंगत जॉन व अलाइस टायलर यांच्या नावाने दिला जातो; तो मिळवणारे सुखदेव हे तिसरे भारतीय आहेत. यंदा हा पुरस्कार त्यांना व अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापिका ग्रेट्चेन सी. डेली यांना विभागून दिला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 1:05 am

Web Title: indian environmental economist pavan sukhdev profile
Next Stories
1 व्हाकिन फिनिक्स
2 कृष्ण बलदेव वैद
3 कर्क डग्लस
Just Now!
X