News Flash

डॉ. सुमथिंद्र नाडिग

कन्नड ही तर त्यांची मातृभाषा होती आणि इंग्रजी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती.

डॉ. सुमथिंद्र नाडिग

कन्नड साहित्यक्षेत्राला महिनाभराच्या अवधीतच दोन धक्के पचवावे लागले. काव्य आणि गीतलेखन हेच ज्यांचे श्रेयस व प्रेयस होते असे एमएन व्यास राव यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून साहित्यक्षेत्र सावरत नाही तोच बुधवारी विख्यात कवी डॉ. सुमथिंद्र नाडिग यांनी जगाचा निरोप घेतल्याची वार्ता आली.

कन्नड साहित्याच्या साठोत्तरी कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे कवी असलेल्या नाडिग यांचा जन्म ४ मे १९३५ चा. चिकमंगळूर जिल्ह्य़ातील कलासा हे त्यांचे मूळ गाव. तरुणपणापासूनच साहित्याची गोडी त्यांना लागली. कन्नड ही तर त्यांची मातृभाषा होती आणि इंग्रजी साहित्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. या शिवाय मराठी, कोंकणी, हिंदी आणि बंगाली भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. १९६० मध्ये गोपाल कृष्ण अडिग यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात आधुनिक साहित्य चळवळ सुरू झाली तेव्हा नाडिग त्या चळवळीत ओढले गेले. याच काळात त्यांचा ‘पंचभूत’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आधुनिक कन्नड काव्यात तो खूपच महत्त्वाचा मानला गेला. नंतर त्यांनी अनेक कविता लिहिल्या. काव्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल अडिग यांच्याखेरीज नरसिम्हचारी, अयप्पा पणिक्कर, सीतांशू यशश्चंद्र, मनोहर राय सरदेसाई, एस एल भैरप्पा, यू आर अनंतमूर्ती यांसारख्या प्रथितयश लेखकांनाही घ्यावीशी वाटली, यातच त्यांच्या लेखनातील कस दिसून येतो. ‘दाम्पत्य गीता’ या त्यांच्या काव्यसंग्रहात प्रेम आणि विवाह याविषयीच्या कविता आहेत. समीक्षकांनी या काव्यसंग्रहाचीही आवर्जून दखल घेतली. द रा बेंद्रे वा के एस नरसिम्ह स्वामी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या साहित्यकृतींवर लिहिताना त्यातील उणिवांवरही त्यांनी बोट ठेवले. लघुकथांबरोबरच मुलांसाठीही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. रवींद्रनाथ टागोरांची काही पुस्तके त्यांनी कन्नडमध्ये अनुवादित केली. अखंड शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या नाडिग यांनी म्हैसूर विद्यापीठासोबतच अमेरिकेतील टेम्पल विद्यापीठातूनही पदव्युत्तर पदवी संपादन केली. हरिद्वारच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठाने ‘शब्द मार्तण्ड’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असल्याने गोवा विद्यापीठासह देशभरातील अनेक विद्यापीठांत अतिथी प्राध्यापक म्हणून ते जात. तीन वर्षे ते नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्षही होते. कर्नाटक सरकारचा व काही खासगी पुरस्कार त्यांना मिळाले, मात्र साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून ते वंचित राहिले. असे असले तरी कन्नड साहित्यातील त्यांची कामगिरी विसरता येणार नाहीच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:02 am

Web Title: indian professor and writer sumatheendra nadig profile
Next Stories
1 शांताबाई काटे
2 राजन नंदा
3 रिचर्ड डिसूझा
Just Now!
X