‘जन्म अलाहाबादचा, महाविद्यालयीन शिक्षण झाले अजमेरच्या सोफिया कॉलेजात, पण मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयात पत्रकारिता पदविकेसाठी त्या आल्या आणि इथल्याच झाल्या’ हा तपशील; किंवा, ‘त्यांच्या आईचे वडील सैद अली जवाद झैदी हे स्वातंत्र्यसैनिक आणि ‘पद्मश्री’प्राप्त उर्दू शायर-लेखक-विचारवंत होते आणि आई शाळेत मुख्याध्यापिका असली, तरी तिच्याही कविता वृत्तपत्रांतून छापल्या जात’ हाही तपशील, म्हणजे काही अ‍ॅनी झैदी यांचे कर्तृत्व नव्हे. काहीएक कौटुंबिक पाश्र्वभूमी साऱ्यांनाच असते, सारेच जण स्थलांतर करीत असतात, तसेच हेही तपशील!

पण अ‍ॅनी झैदी यांच्याबाबत, हे तपशील आत्ता वैशिष्टय़पूर्ण ठरण्याचे कारण त्यांना मिळालेल्या ‘नाइन डॉट्स प्राइझ’ या एक लाख डॉलरच्या (किमान ६९ लाख रु.) पुरस्काराशी निगडित आहे. हा पुरस्कार, झैदी यांना त्यांच्या ‘ब्रेड, सिमेंट, कॅक्टस’ या आगामी पुस्तकासाठी मिळाला आहे, हे विशेष. हे आगामी पुस्तक त्यांनी अद्याप लिहिलेले नाही.. वर्षभराने ते ‘केम्ब्रिज’तर्फे प्रकाशित होणार आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘नाइन डॉट प्राइझ’चे वैशिष्टय़च हे की, एखाद्या विषयावर नवसाहित्यिकांचे निबंध मागविले जातात आणि ‘नाइन डॉट’ने पुरस्कारासाठी निवड केलेल्या एकाच साहित्यिकास रोख रकमेखेरीज, आपल्या निबंधावर आधारित मोठे पुस्तक लिहिण्याआधी केम्ब्रिज विद्यापीठात राहू दिले जाते, प्रकाशनासाठी मदतही केली जाते. यंदाच्या स्पर्धेत झैदी विजेत्या ठरल्या.

आगामी पुस्तक, हे अ‍ॅनी झैदी लिखित आठवे पुस्तक असेल. काव्यसंग्रह, नाटक, कादंबरी, कथा आणि निबंध अशा सर्व प्रकारांत, गेल्या दोन दशकांत झैदी यांनी मुक्तसंचार केला आहे. ‘अ बॅड बॉइज गाइड टु अ गुड इंडियन गर्ल’ हे त्यांचे नर्मविनोदी नटखट शैलीतील पुस्तक; तर गद्यलिखाणाचा भर प्रेमकथांवर. स्त्रियांच्या प्रवासवर्णनपर लिखाणाचे ‘अनबाऊंड’ हे संकलन-संपादन, सहलेखिका म्हणून गुजरातचे वर्णनपर पुस्तक ही त्यांची अतिरिक्त कामगिरी. ‘अनटायटल्ड-१’ आणि ‘जॅम’ या त्यांच्या दोन नाटकांचे प्रयोग पृथ्वी थिएटरला झाले. शिवाय दोन लघुपटही त्यांनी केले आहेत. अशा चतुरस्र, संधींचे वैपुल्य असलेल्या मुंबईकर अ‍ॅनी यांना गेल्या काही वर्षांत अस्मितेविषयी प्रश्न पडले. त्यातून, २०१७ सालापासून त्या उर्दूही शिकू लागल्या (आधी वाचता-लिहिता येत नव्हते). अस्मिता कुटुंबापुरतीच असते हे एक टोक, तर ती किती तरी व्यापक असू शकते हे दुसरे.. या टोकांमधला वैचारिक प्रवास अ‍ॅनी यांना महत्त्वाचा वाटू लागला. स्वत:चा हा प्रवास कसा झाला, इतरांचा कसा होतो, याचे निरीक्षण त्या करू लागल्या. मग कधी तरी आपण ब्लॉगलेखनापासून सुरुवात केली तेव्हाच्या लिखाणात अस्मिता डोकावली का, याचे उत्खननही करून झाले. अशाच वेळी ‘नाइन डॉट प्राइझ’साठीच्या आवाहनाची माहिती त्यांना कळली आणि ‘ब्रेड, सिमेंट, कॅक्टस’ हा निबंध त्यांनी पाठवून दिला.

झैदी यांचे कौटुंबिक तपशील तसेच त्यांच्या स्थलांतरांचे तपशील हे त्या निबंधात थेटपणे नाहीत, पण त्यांची पाश्र्वभूमी त्यांच्या शोधाला आहे.. आगामी पुस्तकातही हेच तपशील महत्त्वाचे ठरणार आहेत!