16 January 2019

News Flash

बालाकुमारन

त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्य़ातला, पण शालेय शिक्षणानंतर चेन्नई हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते.

तमिळनाडूतील बस स्थानकांवर कधी जाण्याची वेळ आली असेल, तर तेथे बहुतांशी सर्वच ठिकाणी बालाकुमारन यांची पुस्तके दिसतात. त्यांच्या किमान आठ पुस्तकांच्या तरी आठ ते दहा आवृत्त्या निघाल्या होत्या. तिथल्या घराघरांत परिचित असलेले कादंबरीकार व चित्रपटकथा लेखक बालाकुमारन यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्य़ातला, पण शालेय शिक्षणानंतर चेन्नई हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. साहित्य हा त्यांचा आवडता प्रांत असला, तरी त्यांच्या चित्रपटातील अनेक संवाद हे सर्वाना परिचयाचे होते. राज राजा चोझान यांच्यावर ‘उदयार’ या पुस्तकाचे सहा खंड त्यांनी लिहिले. त्याच्या किमान पंधरा आवृत्त्या तरी पूर्ण झाल्या आहेत. तमिळनाडूतील  बेस्ट सेलर लेखक म्हणून त्यांचे नाव होते. एका पाक्षिकात त्यांनी रमण महर्षी यांच्यावर मालिका लिहिली होती, त्यामुळे आध्यात्मिक विषयातही त्यांना तेवढाच रस होता. वाझी मयक्कम ही त्यांची पहिली लघुकथा तर ‘कनायाझी’ या नियतकालिकात त्यांची ‘पुढु कविधाई- द टेलिफोन क्लीनर’ ही पहिली धारावाहिक कादंबरी प्रकाशित झाली. त्या काळात तमिळनाडूत दिग्गज संपादक व लेखक यांची उणीव नव्हती तरी ते आव्हान त्यांनी पेलले. बाकीच्या लेखकांना स्त्रियांच्या भावभावनांचा ठाव घेता आला नाही, कारण त्या काळात प्रेम व त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी कथा-कादंबऱ्यांतून येत नव्हत्या, पण त्या बालाकुमारन यांनी साहित्यात आणल्या. आज जशा टीव्ही मालिकांच्या जाहिराती केल्या जातात तसे त्यांच्या ‘थयुमानवर’ या कथामालिकेची जाहिरात मोठे फलक लावून करण्यात आली होती.  एका कृषी कंपनीत ते लघुलेखक होते. ती नोकरी त्यांनी सोडली. नंतर त्यांनी चित्रपटांसाठी कथा व संवाद लिहिले.  ‘थेवरम’, ‘थिरूवचकम’, ‘दिव्या प्रभानंदम’ या अभिजात तमिळ साहित्यकृती त्यांनी आत्मसात केल्या. त्या काळात ‘काचाताथापारा’ हे बंडखोर साहित्य नियतकालिक प्रसिद्ध होत असे, त्याच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यातूनच पुढे ज्ञानकुथन, ना मुथुस्वामी, सा कंदास्वामी यांसारखे लेखक घडले. ‘चिन्ना चिन्ना वट्टनगल’ (टायनी, स्मॉल सर्कल) या पहिल्या लघुकथासंग्रहात त्यांनी त्यांच्या स्वत:भोवतीच्या जगातील व्यक्तिचित्रे रेखाटली. ‘मक्र्युरी पोक्कल’ (मक्र्युरी ब्लॉसम्स) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यात एका कामगाराची प्रेमकथा रेखाटली होती, ती गाजली. ‘आनंदविकटन’, ‘कालक्की’, ‘कुमुदम’ या नियतकालिकांतून त्यांनी केलेले लेखन नंतर छोटेखानी कादंबऱ्यांच्या रूपात प्रसिद्ध झाले. ‘नायकन’, ‘गुना’, ‘बाशा’, ‘जेन्टलमन’ या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. ‘नान ओरू धादवा सोना नोरू धादवा सोना मारी’ (इफ आय हॅव्ह सेड इट वन्स आय हॅव सेड इट अ हंड्रेड टाइम्स) हा रजनीकांतच्या तोंडचा संवाद सर्वाच्या स्मरणात आहे तो बालाकुमारन यांचाच. दोनशेहून अधिक कादंबऱ्या व १०० लघुकथासंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा. त्यांच्या साहित्याला शाश्वत मूल्य असल्याने त्यातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, यात शंका नाही.

First Published on May 19, 2018 2:48 am

Web Title: indian writer balakumaran