23 April 2019

News Flash

गंगारामबुवा कवठेकर

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे त्यांचे मूळ गाव.

गंगारामबुवा कवठेकर

गेली सुमारे ६० वर्षे तमाशाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करतानाच तमाशा ही कला जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने झटणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगारामबुवा कवठेकर यांना शासनाने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर केल्याने तमाशा क्षेत्रातील एका बुजुर्ग व गुणी कलावंताचा गौरव झाल्याची भावना या क्षेत्रात व्यक्त होत आहे. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सनमानचिन्ह असो या पुरस्काराचे स्वरूप असून उद्या, शनिवारीवाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई हे त्यांचे मूळ गाव. अगदी बालपणापासून संवादिनी, संबळ, ताशावादन आणि नृत्य करणाऱ्या कवठेकर यांचा १९५२ ते १९८७ पर्यंत स्वत:चा फड होता. उत्तम ढोलकीपटू, विनोदसम्राट म्हणून कवठेकर लोकप्रिय आहेत. अनेकदा स्त्री-पात्राच्या भूमिकाही त्यांनी मोठय़ा खुबीने रंगवल्या. कवठेकर यांनी तमाशा क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधीलकीही जपण्याचे काम जाणीवपूर्वक केले आहे. शिरूर तालुका तमाशा कलावंत संघटनेचे अध्यक्षपद भूषवताना तमाशा कलावंतांना निवृत्तिवेतन ते त्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांनी शासन दरबारी सतत लढा दिला. शासन चांगल्या योजना आखते, परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही असा सर्वसाधारण अनुभव असतो. यासाठी त्यांनी अशा योजना ग्रामीण भागांत परिणामकारक रीतीने पोहोचवण्यासाठी वेळोवेळी केलेल्या सूचना जिल्हा वा विभागीय स्तरावर मान्य होत असत. युती सरकारच्या आधीच्या राजवटीत साक्षरता अभियानात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून त्यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. हुंडाबंदी विरोधात ‘सोयऱ्याला धडा शिकवा’ हे त्यांनी सादर केलेले नभोनाटय़ त्या काळी तुफान गाजले. व्यसनमुक्ती अभियान, हागणदारीमुक्त गाव तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र समजावून सांगताना कवठेकर यांनी वगनाटय़ाचा केलेला वापर आगळावेगळा व उपयुक्त ठरला होता. याचा उपयोग आकाशवाणीच्या अन्य केंद्रांनाही तेव्हा जाला होता. तमाशा क्षेत्रातील बहुतांश कला अवगत असल्याने त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. एक नामवंत फड मालक, प्रसिद्ध ढोलकीपटू आणि तमाशात सोंगाडय़ाची भूमिका करत त्यांनी रसिकांचे दीर्ध काळ मनोरंजन केले.
गेल्या साठ वर्षांत कवठेकर यांना अनेक खासगी संस्थांचे पुरस्कार मिळाले. महाविद्यालयीन वा विद्यापीठ स्तरावर लोककलाविषयक विविध कार्यक्रमांत त्यांना मार्गदर्शनासाठी आवर्जून बोलावले जाते. नव्या कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे काम ते आजही करीत आहेत.. पूर्वीच्याच जिद्दीने आणि तळमळीने. सध्या ते ८५ वर्षांचे आहेत. या वयातही तमाशा ही कला जिवंत राहावी हाच त्यांचा ध्यास आहे..

First Published on February 19, 2016 3:47 am

Web Title: information about gangarama uva kavthekar