02 June 2020

News Flash

गौतम बंबवाले

त्यांच्या आईला असे वाटत होते की, मुलाने प्रशासकीय सेवेत काम करून नाव कमवावे

गौतम बंबवाले

त्यांच्या आईला असे वाटत होते की, मुलाने प्रशासकीय सेवेत काम करून नाव कमवावे, मुलानेही ते मनावर घेतले व प्रशासकीय सेवेची परीक्षा पहिल्या पाचात उत्तीर्ण झाला. आईचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या मुलाचे नाव गौतम बंबवाले. आता त्यांची पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
ते पुण्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले. त्यांच्या आई उषाताई या ८० च्या दशकात यूपीएससीची परीक्षा देणाऱ्यांना मार्गदर्शन करीत असत. त्यांचे शिक्षण बिशप स्कूल व फर्गसन महाविद्यालयातून झाले. त्यानंतर गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थेतून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली. बंबवाले १९८४ मध्ये परराष्ट्र सेवेत आले. हाँगकाँग व बीजिंगमध्ये जास्त काळ त्यांनी काम केले, १९९४-९८ या काळात ते जर्मनीतील भारतीय सांस्कृतिक केंद्राचे संचालक व बीजिंगमधील दूतावासात उपप्रमुख होते. २००१ मध्ये चोकिला अय्यर परराष्ट्र सचिव असताना ते त्यांच्या कार्यालयात अधिकारी होते. २००७ ते २००९ या चीनच्या भरभराटीच्या काळात ते ग्वांग्झू येथे महावाणिज्य दूत होते. चीनमधून परतल्यावर ते पूर्व आशिया विभागात सहसचिव होते, त्यामुळे जपान, चीन व दक्षिण कोरियाबरोबरचे संबंध सुधारण्यात त्यांनी भूमिका पार पाडली. पाकिस्तानातील नेमणुकीपूर्वी ते भूतानमध्ये भारताचे राजदूत होते. साऊथ ब्लॉकमध्ये ते चीन विषयातील तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानचे चीनशी असलेले घनिष्ठ संबंध बघता त्यांची पाकिस्तानात उच्चायुक्तपदी झालेली नेमणूक भारताला फायद्याचीच ठरणार आहे. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात संवादाच्या माध्यमातून दोन्ही देश सारखी धोरणे बदलत असताना पुन्हा एकदा संवादाचा मार्ग खुला होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क बठकीसाठी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात जाणार आहेत. २००३ मध्ये वाजपेयी यांनी शिवशंकर मेनन यांना पाकिस्तानात नेमले होते. त्यानंतर मेनन परराष्ट्र सचिव झाले. आता बंबवाले यांच्या रूपाने प्रथमच पाकिस्तानात परराष्ट्रनीतीचा गाढा अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक होत आहे. कठीण परिस्थितीतही विचलित न होता काम करण्याची त्यांची हातोटी विलक्षणच. त्यामुळेच त्यांचे सहकारी त्यांना ‘गौतम बुद्ध’ म्हणतात. चीन-पाकिस्तान संबंधांचे त्यांचे आकलन उत्तम असून पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन रस्ते बांधत असताना त्याचा वेगळा अन्वयार्थ ते लावू शकतील आणि राजनीतीची दिशा अचूक ठेवू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:21 am

Web Title: information about gautam bambavale
Next Stories
1 रवींद्र देसाई
2 पु झिकियांग
3 चटला श्रीरामलु
Just Now!
X