मुख्य माहिती आयुक्त हे पद नुसते मानाचे नाही, माहिती अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी होईल व केवळ उचापतखोर मंडळी त्याचा गैरफायदा घेणार नाहीत, याचा अंदाज घेत काम करण्याची कसरत अनेकदा करावी लागते. माहिती अधिकाराचा सुवापर व गैरवापर या मुद्दय़ावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे अलीकडे एका माजी हवाई दल अधिकाऱ्याने माहिती आयोगाकडे ३५०० तर हवाई दलाकडे ६ हजार अर्ज माहिती अधिकारात केले होते. या पाश्र्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी संरक्षण सचिव व ज्येष्ठ सनदी अधिकारी राधाकृष्ण माथूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नेहमीचा शिरस्ता मोडून आधीच्या माहिती आयुक्ताला मुख्य माहिती आयुक्तपदी बढती न देता माथूर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात काही माहिती आयुक्तांनी बढती मिळत नसेल तर आम्ही कामच कशाला करायचे, असा सूर काढला आहे. माथूर हे मणिपूर-त्रिपुरा केडरचे १९७७ च्या तुकडीतील सनदी अधिकारी आहेत, आता त्यांना मुख्य माहिती आयुक्तपदावर तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यांनी संरक्षण विभागात विशेष व अतिरिक्त सचिव म्हणून काम केले होते. त्याआधी ते लघू व मध्यम उद्योग खात्याचे सचिव होते. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९५३ चा. आयआयटी कानूपर येथून बी.टेक पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली आयआयटीतून उद्योग अभियांत्रिकीत एम.टेक केले. स्लोव्हेनिया येथून त्यांनी एमबीए केले. इ.स. २००० ते २००८ या काळात त्यांनी त्रिपुरात विविध पदांवर काम करताना शेवटी मुख्य सचिवपदही भूषवले होते. संरक्षण खात्यातील आधुनिकीकरणाची सुरुवात त्यांनी केंद्रात काम करताना सुरू केली, संरक्षण सामग्री खरेदीच्या पद्धतीत बदल केले. मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात एक मुख्य आयुक्त व दहा माहिती आयुक्त असतात व अजून तीन माहिती आयुक्तांच्या जागा भरणे आवश्यक आहे. याचा अर्थ मुख्य माहिती आयुक्त कार्यालयाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी या उणिवाही भरून काढणे आवश्यक आहे. माथूर यांची नेमणूक मुख्य माहिती आयुक्तपदी केल्याने कदाचित या व्यवस्थेची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे ही जमेची बाजू आहे. कारण सनदी अधिकाऱ्यांना सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याचे कौशल्य अवगत असते, पण त्याच्याच जोडीला बाकीच्या आयुक्तांचा विरोध शांत करून त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागणार आहे. तुलनेने माथूर यांना मिळालेला कालावधी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे ते या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणतील अशी अपेक्षा आहे.