15 December 2017

News Flash

मर्यम मिर्झाखानी

२०१४ मध्ये तिला भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी फील्डस मेडल मिळाले होते.

लोकसत्ता टीम | Updated: July 19, 2017 2:28 AM

मर्यम मिर्झाखानी 

लहान असताना तिने लेखक होण्याचे स्वप्न पाहिले. तिला चित्रकलेची आवड होती. चित्रे काढताना कागदाच्या कडेला काही सूत्रे लिहिण्याची तिची सवय, ती उपजतच म्हणावी अशी. पुढे जाऊन याच सवयीने तिला गणितज्ञ बनवले. तसे बघितले तर गणिताच्या क्षेत्रात फार मोजक्या महिलांनी नाव कमावले आहे त्यातली ती एक. फील्डस मेडल या गणितातील नोबेल समान पुरस्काराची एकमेव महिला मानकरी. इराणचीही पहिली मानकरी, तिचं नाव मर्यम मिर्झाखानी.  पुराणमतवादी इराणची राजधानी तेहरानमध्ये जन्मलेल्या मिर्झाखानी हिचे नुकतेच  कर्करोगाने निधन झाले.

अवघ्या चाळिसाव्या वर्षी तिचा झालेला मृत्यू खरे तर चटका लावणारा. २०१४ मध्ये तिला भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी फील्डस मेडल मिळाले होते. आइन्स्टाइन एकदा म्हणाला होता की, माझ्या बाजूला जी कचऱ्याची टोपली आहे त्यातील कागदाच्या बोळ्यांची संख्या ही नेहमीच पक्क्या गणिती आकडेमोडींच्या कागदांपेक्षा जास्त असते. सैद्धांतिक गणिती अशीच आकडेमोड करतात, सामान्यांना अगम्य अशी. पण तीच पुढे खरी ठरते व हे सैद्धांतिक गणिती प्रत्यक्ष प्रयोग करणाऱ्या वैज्ञानिकांपेक्षा काही वेळा अंगुळीभर सरस ठरतात. मर्यम त्यापैकीच एक. परकीय भाषा जशी ज्यांना अवगत नसते त्यांना अगम्य; तसेच सैद्धांतिक गणिताचे असते. मॉडय़ुली स्पेसेस, टेकम्युलर थिअरी, हायपरबोलिक जिऑमेट्री, एरगॉडिक थिअरी, सिम्प्लेक्टिक जिऑमेट्री या विषयात तिचे विशेष संशोधन होते.

मर्यमचा जन्म १९७७ मध्ये तेहरानला झाला. इराणमध्ये आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड संघात सहभागी झालेली ती एकमेव मुलगी. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले. दुसऱ्या वर्षी तिने दोन सुवर्णपदके पटकावली. इराणमध्ये पदवीधर झाल्यानंतर ती अमेरिकेला गेली. हार्वर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यास करताना शोधनिबंधासाठी तिने जो विषय निवडला होता, त्यात तिने आतापर्यंत न सोडवता आलेले दोन गणिती कूटप्रश्न सोडवले. तिचा शोधनिबंध अमक्या-तमक्याचा तुलनात्मक अभ्यास असा नव्हता तर ती एक शोधयात्रा होती. तिचे गणिती संशोधन हे विश्वाच्या निर्मितीपासून ते क्रिप्टोग्राफीपर्यंत सर्वव्यापी होते. अलीकडे तिने बिलियर्ड्सचे टेबल व त्यावरून फिरणाऱ्या चेंडूच्या गतीचे गणित मांडले होते. जो प्रश्न गेली अनेक शतके अनेक गणितज्ञांना हुलकावणी देत आहे, त्यावर तिने जो शोधनिबंध २०१३ मध्ये लिहिला ती गणितातील नव्या पर्वाची नांदी होती. गणित हे कादंबरीसारखेच असते, त्यातही पात्रे असतात पण गणिती संकल्पनांवर आधारित. प्रत्येक पात्र तुमच्या ओळखीचे असावे लागते, सरतेशेवटी ते पात्र जो आकार घेते तो तुम्ही कल्पिलेल्या पात्रापेक्षा वेगळाच असतो तसेच गणितातही घडते. इराणच्या शरीफ विद्यापीठात असताना तिला गणिताच्या काही शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली होती. लहानपणापासून तिला कादंबऱ्या वाचण्याचे प्रचंड वेड, त्यात आई-वडिलांची आडकाठी नव्हती. भावाला वैज्ञानिक नियतकालिकांची आवड. गणिताशी गट्टी जमलेली मैत्रीण असे सगळे काही जमून आलेले. एकदा भावाने तिला १ ते १०० या आकडय़ांची बेरीज कशी करशील, असा प्रश्न विचारला होता तेव्हापासून गणिताकडे ती आकृष्ट झाली. तिला जेव्हा फील्ड्स मेडल मिळाले तेव्हा अनेक वृत्तपत्रांनी संगणकीय कौशल्याने नसलेला हिजाब तिच्या डोक्यावर चढवला. काहींनी तिची रेखाचित्रे छापली. खरे तर ती त्यापलीकडे होती. तेव्हाच ती आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला गणितज्ञ व वैज्ञानिकांची ‘आयडॉल’ बनली. ती गेली तेव्हा मात्र काळाची चक्रे फिरली! इराणचे सुधारणावादी अध्यक्ष हासन रुहानी यांनी स्वत:च तिचे हिजाब नसलेले मोकळ्या चेहऱ्याचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकले, शेवटी बदल हळूहळू होतात हेच खरे.

First Published on July 19, 2017 2:13 am

Web Title: iranian mathematician maryam mirzakhani