इराणने परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मरझिह अफकाम यांची अलीकडेच मलेशियातील राजदूत म्हणून नेमणूक केली असून १९७९ मधील इस्लामी क्रांतीनंतर इराणमध्ये राजदूतपदावर महिलेची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ. या पदावर नेमणुकीसाठी परराष्ट्र खात्यात महासंचालकपद भूषवणे आवश्यक असते. अफकाम या मध्य-पूर्व व उत्तर आफ्रिकी कामकाज खात्याच्या महासंचालक होत्या. खरे तर त्यांना राजदूतपदी आम्हाला नेमणे सोपे गेले, ते दोन मिनिटांचे काम होते, पण त्यांच्या जागी कुणाची नेमणूक करायची ही खरी अडचण होती, असे परराष्ट्रमंत्री महमद जावेद झरीफ यांनी म्हटले आहे.
अफकाम यांचा जन्म तेहरानमधला तर वंशाने त्या पर्शियन. परराष्ट्र कामकाजात अत्यंत निपुण अशी त्यांची ओळख आहे. या पदावर फक्त विवाहित महिलांचीच नेमणूक केली जाते. गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला असल्याने मग त्यांच्या नेमणुकीत अडचण येण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. जेव्हा हसन रोहानी अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी महत्त्वाच्या पदांवर महिलांना नेमण्यास सांगितले होते. इस्लामी क्रांतीनंतर इराण हा उदारमतवादी बनला तरी महिलांना विवाह, घटस्फोट व वारसा यात फारसा न्याय मिळत नव्हता, ती टीका काही अंशी या नियुक्तीने दूर होईल. अफकाम यांनी गेली तीस वष्रे परराष्ट्र खात्यात काम केले आहे. महिलांना राजदूत नेमायचेच ठरले तर इस्लामी देशात नेमले जाते, पण सध्या मध्य-पूर्वेत संघर्ष चालू असताना तिथे अफकाम यांची नेमणूक करणे शक्य नव्हते त्यामुळे मोजकेच पर्याय होते. मलेशिया व इराण यांचे संबंध चांगले आहेत, तरी अनेक समस्याही आहेत. काही इराणी लोकांनी मलेशियात बेकायदा कारवाया केल्या आहेत. त्यात तस्करी, अमली पदार्थ व्यापार यांचा समावेश आहे. ६ महिलांसह ८६ इराणी लोक तिथे फाशीच्या रांगेत आहेत. ३१ महिलांसह २२१ इराणी लोक तुरुंगात आहेत. त्यांच्या शिक्षा टाळता येणार नाहीत, पण त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्याचे काम नवीन राजदूतांना करावे लागणार आहे. इराणमध्ये मोठय़ा पदांवर महिला आहेत, पण परदेशात प्रतिनिधित्व करणे, देशाची प्रतिमा बनवणे महत्त्वाचे असते. अफकाम यांनी सीरियातील कारवाईबाबत अपेक्षेप्रमाणे अमेरिकाविरोधी भूमिका जाहीर केली आहे. त्या अनुभवी राजनैतिक अधिकारी आहेत, असे त्यांचे वर्णन आधीचे राजदूत अब्बास अरकाची यांनी केले आहे.