News Flash

इसामु अकासाकी

 अकासाकी, अमानो व नाकामुरा या तिघांनी मिळून तीन रंगांचे लाइट एमिटिंग डायोड म्हणजे एलईडी तयार केले होते.

इसामु अकासाकी

प्रकाशाची दुनिया ज्यांनी आपल्या संशोधनाने बदलून टाकली, त्यांमध्ये जपानचे वैज्ञानिक इसामु अकासाकी यांचा क्रमांक अव्वल आहे. ‘एलईडी’ म्हणजे ‘लाइट एमिटिंग डायोड२चे नवेच जग त्यांनी खुले केले. या तंत्रज्ञानाचा प्रसार तुलनेने उशिराच झाला; पण ते गरीब देशांपर्यंत पोहोचले तेव्हा जागतिक तापमानवाढ व दारिद्र्य या दोन गोष्टींवर मात करण्यास मदत झाली. आज आपण भारतातही ‘एलईडी क्रांती’बद्दल ऐकतो. मोठ्या प्रमाणात वीजबचत करणाऱ्या या दिव्यांचा उत्पादन खर्चही आता कमी झाला आहे. अनेकांचे जीवन प्रकाशाने उजळून टाकणारे आणि याच शोधासाठी हिरोशी अमानो व शुजी नाकामुरा यांच्यासमवेत २०१४चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरलेले अकासाकी यांचे नुकतेच निधन झाले.

अकासाकी, अमानो व नाकामुरा या तिघांनी मिळून तीन रंगांचे लाइट एमिटिंग डायोड म्हणजे एलईडी तयार केले होते. एलईडी दिव्यांचे आयुष्य हजारो तास असू शकते. नेहमीच्या म्हणजे थॉमस एडिसनने १९व्या शतकात शोधलेल्या टंग्स्टन दिव्यांच्या किंवा पुढल्या काळातील ‘सोडियम व्हेपर’, ‘मक्र्युरी व्हेपर’ दिव्यांच्या तुलनेत खूप कमी वीज या एलईडी दिव्यांना लागते. नंतरच्या काळात तीन रंगांचे एलईडी दिवे एकत्र करून सूर्यप्रकाशासारखा उजळ प्रकाश देणारा एलईडी पांढऱ्या शीतल शुभ्र पांढऱ्या प्रकाशाचे चांदणे शिंपू लागला. एलईडीने आपले स्मार्टफोन व संगणक यांचे रूप बदलले.

अकासाकी यांचा जन्म जपानमधील कागोशिमात १९२० मध्ये झाला. त्यांचे शिक्षण क्योटो विद्यापीठात झाले. फुजित्सु म्हणजे तेव्हाच्या कोबे कोगयो कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी कारकीर्द सुरू केली. नंतर नागोया विद्यापीठात त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केले. ‘१९८१ मध्ये हे संशोधन आम्ही जाहीर केले. आंतरराष्ट्रीय परिषदेत आम्ही जेव्हा शोधनिबंध वाचला तेव्हा कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. आम्ही एकटे पडलो, आपण काही तरी वेडेपणा केल्यासारखी भावना झाली,’ असे अकासाकी यांनी म्हटले होते. एलईडी बल्बमध्ये लहान अर्धवाहक पट्ट्या वीजपुरवठा केल्यास फोटॉन म्हणजे प्रकाश निर्माण करतात. आज जगात प्रकाश देणाऱ्या उपकरणांची ६० टक्के बाजारपेठ एलईडी उत्पादनांची आहे. २०३० पर्यंत अमेरिकेत एलईडीचा वापर ८० टक्के होईल व त्यामुळे २६ अब्ज डॉलर्सची वीज वाचणार आहे. अकासाकी यांना अनेक संशोधनासाठी पेटंट मिळाले होते. स्वामित्वधनही मिळत होते. त्याचा उपयोग त्यांनी नागोया विद्यापीठात अकासाकी इन्स्टिट्यूट ही नवी संस्था उभारण्यासाठी केला. त्यांना क्योटो पुरस्कार व जपानच्या सम्राटांचा पुरस्कारही मिळालेला होता. ‘ज्याला कुठल्या गोष्टीत कष्टच पडले नाहीत तो काहीच करू शकत नाही,’ हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:05 am

Web Title: isamu akasaki profile abn 97
Next Stories
1 अच्युत गोखले
2 विरूपाक्ष कुलकर्णी
3 डॉ. बी. बी. गायतोंडे
Just Now!
X