संरक्षण दलातील संदेशवहन यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यात ज्यांनी मोठा हातभार लावला त्या काही भारतीय वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे जे. मंजुला. या क्षेत्रात तब्बल २६ वर्षांहून अधिक काळा काम करणाऱ्या मंजुला यांच्या कामाची दखल घेत त्यांना ‘संरक्षण संशोधन व विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टिम्स’ विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या दर्जाचे पद महिलेकडे आले आहे. यापूर्वी जुलै २०१४मध्ये ‘डिफेन्स एविओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ (डीएआरई)च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली होती, तेव्हा त्या पदावर नियुक्त होणाऱ्याही त्याच पहिल्या महिला ठरल्या होत्या.
मंजुला यांचा जन्म १९६२मध्ये आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात झाला. वडील जे. श्रीरामुलू हे जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पुरोगामी ठरणाऱ्या विचारांमुळे मंजुला शिकल्या खऱ्या, पण म्हणून सारेच सोपे नव्हते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मंजुला यांना गणिताचे उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र ते पालकांना शक्य नव्हते.
अखेर मंजुला यांनी स्वतच्या बळावर उच्च शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन’ या शाखेतून अभियांत्रिकी पदवी मिळवली. काही काळ इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसी टीव्हीची कंपनी) येथे काम केले. ‘डीआरडीओ’त १९८७पासून रुजू होऊन, हैदराबाद येथील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी २६ वर्षे काम केले. संदेशवहन प्रणालींचा विशेष अभ्यास असल्याने, देशाच्या संरक्षण दलासाठी संदेश ग्रहण करणारी अत्याधुनिक यंत्रणा मंजुला यांनी विकसित केली. याचबरोबर उच्च क्षमता रेडिओ लहरी प्रणालीही त्यांनी विकसित केली. संदेशवहन यंत्रणा अधिक जलद व सुरक्षित व्हावी यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान आहे. याशिवाय संरक्षण दलासाठी आवश्यक अनेक सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केली आहेत. याचबरोबर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ची रचना आणि विकास या क्षेत्रांत त्यांचा दांडगा अनुभव आहे. ‘डीएआरई’ विभागाच्या संचालकपदी असताना त्यांनी भारतीय हवाई दलात भारतीय बनावटीची ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेर प्रणाली’ कशी वापरता येईल यावर काम करण्यास सुरुवात केली होती. संस्थेतील त्यांच्या कामगिरीबद्दल डीआरडीआने २०११मध्ये त्यांना सवरेत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार प्रदान केला.