गोव्यात जन्मलेले आणि नंतर मुंबईत शिक्षणासाठी आलेले ज. वि. नाईक इथलेच झाले. त्यांचे ‘इथले असणे’ हे केवळ वास्तव्यापुरते नव्हते, हे त्यांचे इतिहासलेखन पाहिल्यास प्रकर्षांने जाणवते. सुमारे सहा दशके आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ‘प्रकल्पा’च्या ध्यासाने इंग्रजीत आणणारे नाईक सर सोमवारी निवर्तले.

इतिहासाच्या अध्यापनास १९६० च्या दशकात सुरुवात केल्यावर दशकभरातच ते मुंबई विद्यापीठात रुजू झाले. तेव्हा प्राचीन किंवा वसाहतवादी इतिहासाचे अध्यापन, लेखन विद्यापीठांत होत असे. या प्रवाहाच्या विरोधी जात त्यांनी आधुनिक महाराष्ट्र, त्यातील प्रबोधनकाळ आणि त्यास आकार देणाऱ्यांविषयी लिहिले. साठच्या दशकारंभी ए. के. मुखर्जीसारख्या अभ्यासकांची भारतीय प्रबोधनकाळाविषयीची मांडणी प्रा. नाईक यांच्या लेखनाचे सूत्र ठरली. त्यामुळेच बंगालपेक्षा महाराष्ट्रातील आधुनिकतेची प्रक्रिया वेगळी आहे, हे त्यांनी सांगितलेच; पण तोवर इंग्रजीत फारसे न आलेले आधुनिक महाराष्ट्रीय जीवन पहिल्यांदा प्रा. नाईक यांनीच ठळकपणे इंग्रजीत आणले. रा. गो. भांडारकर, भाऊ  महाजन, ना. गोखले, भास्कर पांडुरंग, भाऊ  दाजी, र. धों. कर्वे अशा व्यक्ती असोत वा परमहंस सभेसारख्या संस्था, प्रा. नाईक यांचे याविषयीचे संशोधन अनेक अभ्यासकांसाठी आजही संदर्भसाधन ठरते आहे. न्या. रानडे आणि प्रार्थना समाज हा तर त्यांच्या विशेष आस्थेचा भाग. त्यावर त्यांनी पीएच.डी.साठी संशोधनही केले; पण १९६५ च्या युद्धात एनसीसीतून ते युद्धभूमीवर गेल्याने त्यांचा प्रबंध पूर्ण होऊ शकला नाही. ‘आधुनिकता हवी, पण पाश्चात्त्यीकरण नको’, या मताचा प्रभाव त्यांच्यावर असल्यानेच केम्ब्रिज स्कूलच्या इतिहासकारांनी केलेली मांडणी नाकारून, ब्रिटिश आले नसते तरी ‘भारतीय राष्ट्रवाद’ निर्माण झालाच असता, असे म्हणणे प्रा. नाईक यांनी केले. तरी ब्रिटिश राजवट व इंग्रजी प्रागतिक विचार यांच्यातील फरकही ते जाणत होते. त्यामुळेच मराठीजनांनी ‘मिल्ल’ला  दिलेले उत्तर असो, अव्वल इंग्रजीतील जाव्‍‌र्हिस बंधूंचे कर्तृत्व असो वा परमहंस सभेचा जातविरोधी विचार असो, हे सांगण्यास ते कचरले नाहीत. भारत व कॅनडा यांच्या राष्ट्रवादाविषयी तुलनात्मक लेखनही त्यांनी केले. पुरावानिष्ठ लेखनावर विश्वास असलेल्या प्रा. नाईकांनी पुढील काळात लवचीकता आणि खुलेपणाही दाखवला. डाव्या-उजव्या कंपूंत ते नव्हते, पण २०१५ मध्ये देशभरच्या इतिहासकारांनी असहिष्णुतेच्या वातावरणाविरोधात काढलेल्या निवेदनावर त्यांनीही स्वाक्षरी केली. याचे कारण अलीकडेच एका अकादमिक चर्चेत त्यांनी मांडलेल्या विचारांत सापडेल. ते म्हणाले होते : ‘इतिहासाचा पहिला नियम म्हणजे खोटं बोलायचं नाही आणि दुसरा नियम म्हणजे संपूर्ण सत्य सांगायला घाबरायचं नाही!’