मराठी रंगभूमीवरील ‘फार्सचे बादशहा’ असे ज्यांना संबोधले जाते त्या आत्माराम भेंडे यांच्या तालमींत तयार झालेले विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांनी नुकतीच इहलोकातून एक्झिट घेतली. उच्चविद्याविभूषित व कॉर्पोरेट क्षेत्रात उच्चपदस्थ असतानाही रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरात क्षेत्रांत चौफेर मुशाफिरी करणारे किशोर प्रधान यांना अभिनयाचे बाळकडू घरातच मिळाले. त्यांची आई नाटकांतून कामे करायची.  स्वाभाविकपणेच लहानग्या किशोरला नाटकाने झपाटले नसते तरच नवल.

शाळा, कॉलेज, हौशी संस्था यांतून प्रारंभी नाटके करणारे किशोर प्रधान पुढे मुंबईत आले तेव्हा त्यांचे नाटय़संस्कार त्यांना स्वस्थ बसू देईनात. त्यांनी ‘नटराज’ ही संस्था स्थापन करून ‘तीन चोक तेरा’ हे शाम फडके यांचे नाटक बसवायला घेतले. त्याकरता नायिकेचा शोध घेताना त्यांना गुजराती नाटकांतून काम करणारी एक मुलगी सापडली, जी पुढे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचीही नायिका बनली. तिचे नाव- शोभा प्रधान! त्यांचे हौशी नाटक बघून व्यावसायिक रंगभूमीवरील निर्माते यशवंत पगार त्यांच्यावर फिदा झाले आणि त्यांनी प्रधान यांना मुख्य धारा रंगभूमीवर येण्याची ऑफर दिली. प्रधान यांनी ही संधी साधली आणि तिथूनच त्यांची रंगभूमीवरील घोडदौड सुरू झाली. आपला उपजत कल ओळखून त्यांनी विनोदी अभिनेते म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याकाळी फार्स हा नवा नाटय़प्रकार मराठी रंगभूमीवर रुजवण्याचा विडा आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या दुकलीने उचलला होता. त्यात किशोर प्रधान हेही सहयात्री म्हणून सामील झाले. पुढे भेंडे त्यांना भरत दाभोळकर यांच्या ‘हिंग्लिश रेव्ह्य़ू’ नामे देशी इंग्रजी रंगभूमीवरही घेऊन गेले. तोवर पाश्चात्त्य इंग्रजी क्लासिक्सवर पोसलेल्या भारतीय इंग्रजी रंगभूमीला ‘हिंग्लिश रेव्ह्य़ू’ हा एक सांस्कृतिक धक्काच होता. परंतु प्रेक्षकांनी मात्र हा देशी वाण चांगलाच उचलून धरला. पुढे देशभरातही हे संकरित नाटय़बियाणे सहजी स्वीकारले गेले. त्यायोगे किशोर प्रधान यांनाही निरनिराळ्या प्रांतांतील प्रेक्षकांचा अनुभव गाठीशी आला.

दरम्यानच्या काळात ‘हास परिहास’, ‘गजरा’ यांसारख्या दूरदर्शन कार्यक्रमांनी त्यांना सर्वदूर ओळख दिली होतीच. नोकरीतून निवृत्तीनंतर त्यांनी चित्रपटांकडेही आपला मोर्चा वळवला. तिथेही मराठी-हिंदी चित्रपटांतून त्यांनी आपले नाणे खणखणीतपणे वाजवून दाखविले. विनोदी अभिनेत्याला नेहमी प्रेक्षकानुनयाची भूल पडते. परंतु किशोर प्रधान यांनी त्यात वाहवत जाणे कटाक्षाने टाळले. विनोदाची उत्तम जाण जपतानाच प्रेक्षकांना उच्च प्रतीचा कलानुभव मिळावा याचीही दक्षता त्यांनी उन्मेखून घेतली.