News Flash

जॅक चार्ल्टन

जॅक लीड्स युनायटेडकडे वळले आणि त्या क्लबसाठी १५ वर्षे खेळले.

जॅक चार्ल्टन
जॅक चार्ल्टन

 

‘तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल, तर जॅक चार्ल्टनसारखा फुटबॉलपटू संघात हवाच’.. १९६६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला जगज्जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणारे सर जेफ हर्स्ट यांचे हे वाक्य. हर्स्ट हे स्ट्रायकर, म्हणजे चढाईवीर. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारे आजवरचे एकमेवाद्वितीय. ते ज्यांच्याविषयी असे म्हणाले ते जॅक चार्ल्टन हे बचावपटू. हर्स्ट यांच्यासारखे स्ट्रायकर गोलधडाका चालवत असताना, प्रतिस्पर्ध्याकडून आपल्यावर गोल चढू न देण्याची महत्त्वाची जबाबदारी बचावपटूंची असते. जॅक चार्ल्टन म्हणजे त्यांच्या संघासाठी भिंत होते. या खेळात गोल करणाऱ्या आणि गोलसाठी पासेस पुरवणाऱ्या स्ट्रायकर-प्लेमेकर मंडळींना पुजले जाते. त्या तुलनेत गोल रोखण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बचावपटूंचा आणि गोलरक्षकांचा म्हणावा तसा गौरव होत नाही. जॅक चार्ल्टन यांनी या वास्तवाची फिकीर कधी केली नाही. त्यांच्या काही जुन्या चित्रफिती पाहिल्यावर लक्षात येईल की, फुटबॉलवरील त्यांचे कौशल्य इतर कोणापेक्षाही अजिबात कमी नव्हते. पण बचावपटूला आखून दिलेली मर्यादा त्यांनी कधी मोडली नाही. एखाद्या चढाईवीराला रोखून किंवा प्रसंगी चकवून चेंडू आपल्या सहकाऱ्याकडे धाडताच चार्ल्टन चपळाईने आपल्या नेमून दिलेल्या जागी जाऊन उभे राहात. खाणकामगाराच्या कुटुंबात जन्माला येऊनही जॅक व त्यांचे धाकटे बंधू बॉबी घरच्यांच्या पाठिंब्यावर फुटबॉलकडे वळले. दोघांच्या वाटा वेगळ्या होऊन बॉबी मँचेस्टर युनायटेडमध्ये स्ट्रायकर-प्लेमेकर म्हणून जगप्रसिद्ध झाले. जॅक लीड्स युनायटेडकडे वळले आणि त्या क्लबसाठी १५ वर्षे खेळले. बॉबी यांच्याइतकी प्रसिद्धी जॅकना मिळाली नाही. पण विश्वचषक-१९६६ मध्ये इंग्लंडच्या सर्व सामन्यांत ते खेळले. पुढे त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही उत्तम काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेफील्ड युनायटेड, मिडल्सब्रो, न्यूकॅसल युनायटेड या तशा कमकुवत संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आर्यलड संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्याचमुळे आर्यलडचा संघ प्रथमच युरो १९८८, तसेच विश्वचषक १९९० आणि १९९४ स्पर्धासाठी पात्र ठरला. युरो १९८८ स्पर्धेत आर्यलडने इंग्लंडवर १-० अशी धक्कादायक मात केली. दोन्ही विश्वचषक स्पर्धात हा संघ बाद फेरीत पोहोचला होता. त्यातही १९९४ मध्ये आर्यलडने बलाढय़ इटलीला हरवून धमाल उडवून दिली होती. मर्यादित स्रोत व त्याहूनही कमी अपेक्षा असतानाही संघाकडून चांगली कामगिरी करवून घेता येते, हे त्यांनी सातत्याने सिद्ध केले. मैदानी खेळांची आवड, मिश्कील वृत्ती, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी आणि वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघहिताला प्राधान्य हे त्यांचे गुण आज गतशतकातले नि म्हणून विस्मृतीत गेल्यागत झाले आहेत. आता तर त्यांचे शारीर अस्तित्वही संपले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:01 am

Web Title: jack charlton profile abn 97
Next Stories
1 नगीनदास संघवी
2 एनिओ मॉरिकोन
3 सरोज खान
Just Now!
X