02 June 2020

News Flash

जॅक टेलर- रॉबर्टसन

इराणवर शहांची आधुनिकतावादी सत्ता असताना, १९७० च्या दशकात त्यांना तेहरानच्या नव्या भागाची रचना करण्याचे काम मिळाले.

जॅक टेलर- रॉबर्टसन

वास्तुरचनाकार हा फक्त ‘बिल्डरसाठी आराखडे काढणारा’ व्यावसायिक नसतो, उभारलेल्या वास्तूंनी कोणत्या संस्कृतीशी नाते सांगावे हे तो ठरवत असतो, प्रसंगी वास्तूंचाच नव्हे, तर नगरांचा तो अभिकल्पक (डिझायनर) असतो. नगराच्या रचनेमधून तो शहरवासीयांच्या जगण्याचा मार्गही ठरवत असतो. याहीपुढे जाऊन वास्तुरचनाकारांची पुढली पिढीदेखील तो घडवू शकतो! ही सारी कर्तव्ये अमेरिकेच्या संदर्भात जॅकलिन ऊर्फ जॅक टेलर- रॉबर्टसन यांनी आवडीने पार पाडली. त्यांचे निधन ९ मे रोजी झाल्यावर अमेरिकन वास्तुरचना क्षेत्राने काय गमावले याचाही ताळेबंद मांडला गेला.

अमेरिकी वास्तुकला काचेच्या इमारतींत अडकली असतानाच्या काळात जॅक टेलर-रॉबर्टसन यांनी डिस्ने कंपनीसाठी ‘सेलिब्रेशन’ नावाचे अख्खे नगर फ्लोरिडात उभारून, ऐसपैस जगण्याला- शहर हिंडणाऱ्या माणसांना महत्त्व दिले. मेक्सिकोच्या आखातानजीक ‘वॉटर कलर्स’ हे दुसरे नगर उभारताना त्यांनी निर्णयपूर्वक, जुन्या अमेरिकी/ स्पॅनिश वास्तुशैलींची बाह्य वैशिष्टय़े जपणाऱ्या आधुनिक इमारती उभारल्या. त्यांनी साकारलेल्या अनेक सार्वजनिक इमारतीदेखील ही जुनी वैशिष्टय़े जपणाऱ्या होत्या. यावरून त्यांना वास्तुरचनेतील ‘देशीवादी’ ठरविण्यात आले. स्वत: जॅक मात्र, ‘माझ्या इमारती या मेंढीचे कातडे पांघरलेल्या कोल्ह्यासारख्या फसव्या आहेत’ असे विनोदाने म्हणत.. ‘अंतर्भाग आणि बाहेरचा भाग यांच्यामध्ये मोकळी जागा सोडण्याची माझी शैली ल कॉर्बुझिएसारखी आहे’ हेही कबूल करत. ऐन उमेदीत, न्यू यॉर्कच्या काही भागाचे नगररचनाकार म्हणून त्यांना संधी मिळाली असता, तेथील मेयरना (आर्थिक अधिकार असलेल्या महापौरांना) त्यांनी ‘नगराचे सौंदर्य वाढते ठेवण्यासाठी’ वास्तुरचना व नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञांची स्थायी समिती नेमण्यास भाग पाडले. ही समिती १९६० च्या दशकात स्थापन झाली व ती आजही कार्यरत आहे.

इराणवर शहांची आधुनिकतावादी सत्ता असताना, १९७० च्या दशकात त्यांना तेहरानच्या नव्या भागाची रचना करण्याचे काम मिळाले. आराखडा रूपात ते पूर्ण झाले, तेव्हाच १९७९ ची ‘इस्लामी क्रांती’ झाली आणि इराणहून जॅक मायदेशी आले. १९८० ते ८८ अशी आठ वर्षे त्यांनी व्हर्जिनिया विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’चे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले, अध्यापनही केले. विद्यापीठाबाहेरही अनेक व्याख्यानांतून नव्या वास्तुरचनाकारांना दिशा दिली. अर्थात, अमेरिकी माध्यमांना त्यांचे कौतुक आहे ते तारे-तारकांची आणि वित्त/आर्थिक क्षेत्रातील बडय़ा प्रस्थांची घरे जॅक यांनी आरेखित केली, म्हणूनसुद्धा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 12:01 am

Web Title: jack taylor robertson profile abn 97
Next Stories
1 शोभना नरसिंहन
2 योगेन्द्र सिंह
3 हरी वासुदेवन
Just Now!
X