दिल्लीतील ललित कला अकादमी, त्या अकादमीचा ‘गढी’ स्टुडिओ, ‘आयफॅक्स’ म्हणून ओळखली जाणारी अ. भा. चित्रकला संस्था अशा संस्थांशी संबंधित राहिलेले जय झरोटिया हे बऱ्याच मुंबईकर कलारसिकांना माहीत नसतील, पण दिल्लीत त्यांची नक्कीच छाप होती. केवळ राष्ट्रीय संस्थांचे पुरस्कार मिळाले आणि या संस्थांच्या कार्यकारी मंडळांवर स्थान मिळाले म्हणून नव्हे, तर विद्यार्थीप्रिय कला-अध्यापक या नात्यानेही ते परिचित होते. ज्येष्ठ चित्रकार आणि आधार वाटावा असा माणूस, हा त्यांचा लौकिक त्यांच्या निधनानंतरही कायम राहील.

जय झरोटियांचा जन्म १९४५ चा. दिल्लीत ‘शिल्पी चक्र समूहा’चा प्रभाव ओसरू लागल्याच्या काळात ते शिकले आणि साठोत्तरी पिढीप्रमाणे ‘स्वतंत्र शैली’ शोधू लागले. त्यासाठी त्यांना शिल्पी चक्रातील भाबेशचंद्र सन्याल किंवा प्राणनाथ मागो यांचा नव्हे, तर पॉल क्ली- कान्डिन्स्की या विदेशी चित्रकारांचा रस्ता आपला वाटला. अशा काही चित्रकारांनी १९७४ मध्ये ‘न्यू ग्रूप’ नावाचा समूह दिल्लीत स्थापला होता आणि जय झरोटियांचाही समावेश त्यात होता (तेव्हा ते मुद्राचित्रे करीत), पण तो अल्पजीवी ठरला. कलेत अमूर्तता हवीच आणि तिचा पाया भावनिक हवा, हा त्यांचा आग्रह कायम असे. त्यामुळे रंगांचा मुक्त वापर, आकारात  रेखीवपणापेक्षा रेषेच्या वळणांना प्राधान्य, ही वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रांमधून दिसत. भारतात मुंबई, कोल्हापूर, बंगाल (कोलकाता/ शांतिनिकेतन) इथले चित्रकार निव्वळ शैलीवरून ओळखता येण्याचा तो काळ. तोवर दिल्लीचे चित्रकार सहसा  ‘मानवाकृतींची मांडणी’ या पद्धतीने चित्रे करीत, तर शिल्पकलेत मात्र केवलाकारी रचनेला महत्त्व देत. या दोन्ही वाटा जय झरोटियांनी बाद केल्या आणि जगदीश स्वामीनाथन यांच्या वाटेने ते गेले. ही पद्धत, केवळ एखाद्या वळत्या रेषेतून झालेला आकार, भिन्न अर्थाच्या आकारांचे गूढ साहचर्य यांना महत्त्व देते. मुद्राचित्रणातही त्यांना गती होती. मुद्राचित्रकार (‘एचिंग’ तंत्रात) जसे  एकाच प्लेटवर दोन निरनिराळे जस्ततुकडे ठेवून एकसंध परिणाम साधतात, तशी जय झरोटिया यांची चित्रे दिसत. यात बदल झाला, तो त्यांच्या वयाच्या साठीनंतर, २००५ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ दिल्लीत प्रदर्शने भरली त्याहीनंतर! गेल्या १५ वर्षांतील त्यांची चित्रे पुन्हा मानवाकृतीप्रधान दिसू लागली. एव्हाना झरोटिया यांना अनेक पारितोषिके तसेच पदे मिळाली होती. तरीही, ‘विद्यार्थ्यांकडून काम करून घेणारे अध्यापक’ ही ख्याती कायम होती. त्यांच्या निधनाने अनेकांनी,  मित्रतुल्य शिक्षक गमावला आहे.