बोनो हा अमेरिका आणि युरोपात नव्वदीच्या दशकात गाजलेला पॉप-गायक. एका कार्यक्रमात त्याने जाहीरपणे प्रश्न केला- ‘आर्थिक क्षेत्रातला ‘एल्व्हिस प्रिस्ले’ कोण?’ आणि त्यानेच उत्तरही दिले- ‘अर्थात जेम्स वूल्फेन्सन! जागतिक बँकेचे प्रमुख!!’ यात तत्कालीन अतिशयोक्तीचा भाग होता; पण एल्व्हिस प्रिस्लेने पॉप संगीताला जे वलय दिले, आफ्रिकी-अमेरिकी ‘ब्ल्यूज’पासून अनेक परींच्या संगीतातून एल्व्हिस जे शिकला, ते वित्तीय क्षेत्रात करण्याचा प्रयत्न वूल्फेन्सन यांनी केला, असे आजही म्हणता येते. या वूल्फेन्सन यांची निधनवार्ता भारतात गुरुवारी सकाळीच पोहोचली तेव्हा अनेकांना आठवला असेल तो १९९५ ते २००५ हा जागतिक बँकेतील त्यांचा कार्यकाळ! हाच काळ जागतिकीकरणाची फळे भारतास मिळण्याचा आणि जागतिक बँकेचे चीन व भारत वा ‘चिंडिया’वर विशेष लक्ष असण्याचा. मूळचे ऑस्ट्रेलियाचे, १९३३ साली जन्मलेले वूल्फेन्सन अमेरिकास्थित जागतिक बँकेपर्यंत पोहोचले त्याआधी ऑस्ट्रेलियातच आधी वकील आणि मग बँकर म्हणून कारकीर्द करताना, त्यांनी मायदेशाचे प्रतिनिधित्व थेट ऑलिम्पिकमध्येही- तलवारबाजी या खेळात केले होते. समोरच्याला जोखण्याचे कसब अचूकच असावे लागणाऱ्या या खेळासारखे त्यांचे खासगी बँकिंग क्षेत्रातील निर्णय होते. वित्तीय क्षेत्रात दाखवलेल्या धडाडीमुळे ते ऑस्ट्रेलियातून लंडनला गेले, तिथे एका खासगी बँकेत असताना ‘क्रिसलर’ या ऐंशीच्या दशकाअखेर डबघाईस आलेल्या कंपनीस वित्तपुरवठय़ाचा निर्णय त्यांनी घेतला आणि अमेरिकेत, बेन बर्नान्के यांचे चेले म्हणून ते ओळखले जाऊ लागले. जागतिक बँक अध्यक्षपद मिळाल्यानंतर वूल्फेन्सन यांनी या संस्थेचा अमेरिकी चेहरा बदलण्याचा प्रयत्न बुद्धय़ा केला. त्यासाठी चीन, भारत, थायलंडसारखे देश कणखर अर्थसत्ता झाले पाहिजेत, या दृष्टीने त्यांचे निर्णय मोलाचे ठरले. अर्थात, आशियाई वित्तसंकट किंवा ‘९/११’नंतर अमेरिकेने लादलेले ‘वॉर ऑन टेरर’ यामुळे हे बिगरअमेरिकीकरणाचे यत्न फसले असेच दिसते. शिवाय, अमेरिकेतील दोन्ही पक्ष हे वूल्फेन्सन यांचे टीकाकारच ठरले आणि अगदी जॉर्ज सोरोससुद्धा वूल्फेन्सनप्रणीत धोरणांवर टीका करू लागले. जागतिक बँकेची कार्यक्षमता यांच्या निर्णयांनी ढासळते आहे, असा टीकेचा सूर. पण प्रत्यक्षात, ‘स्ट्रक्चरल अ‍ॅडजस्टमेंट’च्या सक्तीला नवा ‘दारिद्रय़ निर्मूलना’चा चेहरा देण्याचे महत्कार्य वूल्फेन्सन यांचेच. त्यासाठी बँकेतच स्वयंसेवी संस्थांची सल्ला-समिती त्यांनी नेमली होती! शिवाय, ‘आधी पुनर्वसन- मग धरण’ हा निर्णयही त्यांच्या काळातला. अखेर याच वूल्फेन्सन यांना धाकल्या बुश यांचे ‘इराक-फेरउभारणी’सारखे हट्ट पुरवावे लागले. मात्र टीकाकारही, जागतिक बँकेच्या समन्यायीकरणाचे त्यांचे प्रयत्न मान्य करतात.