अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सिलिकॉन व्हॅली हे जगाचे सायबर केंद्र म्हणून ओळखले जाते. सायबरविश्व किंवा इंटरनेटशी संबंधित विविध प्रयोग येथे केले जातात. या प्रयोगांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून देणारे सजग गुंतवणूकदार तेथे आहेत. निर्मिती आणि नवप्रवर्तनासाठी उत्तम संशोधन उपलब्ध करून देणारी विद्यापीठे त्या देशात आहेत. तरीही तेथे स्वत:ची छाप पाडण्यासाठी, जम बसवण्यासाठी वेगळी आंतरिक ऊर्जा आणि प्रतिभा आवश्यक असतेच. हे गुण तेथे दाखवलेल्या मोजक्या भारतीयांच्या यादीत आता जय चौधरी यांचे नावही समाविष्ट करावे लागेल. जय चौधरी यांचा नुकताच ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. चौधरी यांच्या झीस्केलर कंपनीत त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांच्या समभागांचे मूल्यांकन ३४० कोटी डॉलर (किमान २४,१०२ कोटी रुपये) इतके गेल्या वर्षभरात नोंदवले गेले. झीस्केलर ही कंपनी सायबर सुरक्षा या अत्यंत वेगाने वाढणाऱ्या व संवेदनशील क्षेत्रातली अग्रणी समजली जाते. सायबर अर्थात इंटरनेट सिक्युरिटी आणि पुंज सुरक्षा (क्लाऊड सिक्युरिटी) क्षेत्राचे महत्त्व जय चौधरी यांनी जवळपास दीडेक दशकांपूर्वी जाणले होते. सिलिकॉन व्हॅलीतील यशस्वी नवउद्यमींचा एक ठरलेला मार्ग म्हणजे काही तरी नवीन निर्माण करायचे आणि ते उत्पादन किंवा संकल्पना एक दिवस एखादी बडी कंपनी खरीदणार! आतापर्यंत चौधरी यांनी स्थापलेल्या कंपन्या मोटोरोला, आयबीएम, युनिसिस अशा कंपन्यांनी ताब्यात घेतल्या. झीस्केलर मात्र वेगळी ठरली आणि अल्पावधीतच स्वत एक मोठी कंपनी बनली. या कंपनीचे सर्वेसर्वा अर्थातच जय चौधरी. हिमालयातील एका गावात त्यांचा जन्म झाला, त्या वेळी तेथे नळाचे पाणीही उपलब्ध नव्हते. ‘शेतकरी पालकांकडून आपण साधेपणाची दीक्षा घेतली,’ असे चौधरी आजही सांगतात. बनारस विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी, मग अमेरिकेत सिनसिनाटी विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी, उद्योग अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर पदवी असा जय चौधरी यांचा उच्चशिक्षण प्रवास. मागे वळून पाहताना आपण हरखून जातो. पण ‘हे यश पैशाच्या मागे न धावल्यामुळे मिळाले,’ असे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले आहे. हल्ली ऑनलाइन मार्गाने कोटीच्या कोटींचे व्यवहार, उलाढाली होतात. त्यातून यश चटकन मिळत असले, तरी सायबर हल्ले आणि माहितीचौर्याचे प्रकारही काही पटींनी वाढले आहेत. त्यामुळे कंपन्या आणि व्यक्तींचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे आपला एकमेव उद्देश सायबरविश्व सुरक्षित करणे हा आहे, असे चौधरी सांगतात.