24 September 2020

News Flash

यिरी मेंझेल

राजकीय अडथळे झेलत त्यांनी तीन दशकांत डझनाहून अधिक सिनेमे केले

यिरी मेंझेल

जागतिक सिनेमाचा इतिहास अनेक नवप्रवाही चित्रपटांशिवाय अपुराच. या नवप्रवाही चित्रपटांचा विचार चेकोस्लोव्हाकियन (त्यातही आताच्या चेक रिपब्लिकच्या) सिनेमांशिवाय करता येणार नाही. साठच्या दशकात तेव्हाच्या चेकोस्लोव्हाकियात नव्या पद्धतीने काही सांगू पाहणाऱ्या तरण्याबांड दिग्दर्शकांची एक फळीच निर्माण झाली होती. चेक प्रदेशातील खळाळत्या लोकजीवनाचा, तिथल्या माणसांचा जगण्याचा आरसा दाखवणाऱ्या या दिग्दर्शकांनी घडवलेली सिनेकलाभिव्यक्तीची चळवळ ‘चेक न्यू वेव्ह’ म्हणून ओळखली जाते. त्या चळवळीतील महत्त्वाचा दिग्दर्शक असलेल्या यिरी मेंझेल या अवलियाने गत शनिवारी वयाच्या ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

१९३८ साली- म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नांदीकाळात जन्मलेल्या यिरी मेंझेल यांना पेशाने पत्रकार, पण बालसाहित्यातही मुशाफिरी करणाऱ्या वडिलांकडून कथनाची परंपरा मिळाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान चेकोस्लोव्हाकियावर हिटलरी कब्जा असताना नाझीवादविरोधी सिनेमे बनवणारे दिग्दर्शक ओटाकर वावरा यांच्या हाताखाली प्रागमधल्या सरकारी फिल्म अकादमीत मेंझेल यांनी सिनेमाचे धडे गिरवले. तोवर चेकोस्लोव्हाकिया सोव्हिएत रशियाच्या कह्य़ात जाऊन पडला होता. उत्तरेकडून युरोपचा मैदानी प्रदेश व दक्षिणेकडून डॅन्युबचे मध्य खोरे चेकोस्लोव्हाकियात एकमेकांत मिसळतात, म्हणून या प्रदेशास ‘युरोपचा चव्हाटा’ म्हटले जाते. साहजिकच ‘चव्हाटय़ा’वरील संस्कृती या प्रदेशात रुजली आहे. शेती व कारखानदारीतून आलेली समृद्धता आणि जीवनाचा मनमुराद आस्वाद घेणारे लोकजीवन हे चेकचे वैशिष्टय़. त्यामुळे साम्यवादी राजवट, सोव्हिएत रशियन वर्चस्व मुक्त जीवनाची आकांक्षा असणाऱ्यांना गुदमरवणारे ठरले. परिणामी साठच्या दशकापर्यंत व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीने तिथे मूळ धरले. नेमक्या त्या काळात, पंचविशीतले यिरी मेंझेल दिग्दर्शक म्हणून सक्रिय झाले.

नाझीवादविरोधी लढय़ात जीव गमावलेला कादंबरीकार व्लादिस्लाव्ह वांकुरा आणि मानवी जीवनातल्या करडय़ा जागा उपहासाने व चित्रदर्शी कथनशैलीने सांगणारा बोहुमिल ऱ्हाबाल या चेक लेखकाच्या साहित्याचा प्रभाव मेंझेल यांच्यावर होता. वयाच्या २८ व्या वर्षी, म्हणजे १९६६ साली मेंझेल यांनी ऱ्हाबाल यांच्याच कादंबरीवर बेतलेला ‘क्लोजली वॉच्ड ट्रेन्स’ हा सिनेमा बनवला. नाझी हुकूमशाहीविरोधी एका लहानशा कारवाईभोवती गुंफलेल्या, चेक समाजाची लोकरहाटी सांगणाऱ्या आणि त्यात तरण्या नायकाची घालमेल चितारणाऱ्या या चित्रपटास परदेशी भाषा विभागातील ऑस्कर मिळाल्याने चेक नवप्रवाही चित्रपटांच्या नवलाईवर शिक्कामोर्तब झाले. चित्रीकरणाची, कथनाची नवी पद्धत आणणाऱ्या फ्रेंच नवप्रवाही व महायुद्धोत्तर जनमानस टिपणाऱ्या इटालियन नववास्तववादी सिनेमांचा सुवर्णमध्य मेंझेल आणि त्यांच्या सहचित्रकर्मीनी साधला. राजकीय अडथळे झेलत त्यांनी तीन दशकांत डझनाहून अधिक सिनेमे केले. ‘माय स्वीट लिटिल व्हिलेज’, ‘द स्नोड्रॉप फेस्टिव्हल’, ‘हू लुक्स फॉर गोल्ड’ ते २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आय सव्‍‌र्हड् द किंग ऑफ इंग्लंड’ यांसारख्या सिनेमांतून साध्या माणसांच्या ‘मोठय़ा’ गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या आपण- भारतीयांनी- का समजून घ्यायच्या, ते कळण्यासाठी शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी बनविलेल्या ‘चेकमेट : इन सर्च ऑफ यिरी मेंझेल’ दीर्घ (७ तास!) माहितीपटाकडे वळावेच लागेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 12:01 am

Web Title: jiri menzel profile abn 97
Next Stories
1 डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर
2 मीना देशपांडे
3 प्रा. गोविंद स्वरूप
Just Now!
X