काश्मीरमधील साहित्यिक, कवी, विद्वान व समीक्षक डॉ. जितेंद्र उधमपुरी हे बहुमुखी प्रतिभेचे लेखक आहेत. त्यांना यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अडीच लाख रुपयांचा हा सन्मान असून त्यामुळे काश्मिरी साहित्यालाही राष्ट्रीय पातळीवर मोठे स्थान मिळाले आहे यात शंका नाही.
डॉ. उधमपुरी यांचा जन्म उधमपूर येथे एका खेडय़ात १९४४ मध्ये झाला, तेथेच एका साध्या शाळेत शिक्षण झाले व गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली. डोगरी भाषेत ते डॉक्टरेट आहेत. खरे तर सुरुवातीला ते लष्करात नोकरीला होते, पण तेथे काही काळ काम केल्यानंतर ते आकाशवाणीत रुजू झाले. जम्मू भागात ज्याच्यात्याच्या तोंडी उधमपुरी यांचे नाव आहे इतके ते परिचित आहेत. आयुष्यातील ३० वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या सेवेत घालवली व वरिष्ठ संचालक म्हणून निवृत्त झाले. डोगरी, हिंदी, उर्दू, पंजाबी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून या भाषेत त्यांनी ३० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची भाषांतरे इंग्रजी, नेपाळी व चेक भाषेत झाली आहेत. आधुनिक डोगरी कवितेचे ते प्रवर्तक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांच्या शैलीत अनेक प्रयोग केले आहेत. १९६२ मध्ये त्यांनी पहिली उर्दू गझल लिहिली. त्यांनी डोगरी, हिंदूी, उर्दू व पंजाबी या भाषांची जी सेवा केली आहे ती अतुलनीय अशीच आहे.
गालिब, फैज महंमद, महादेवी वर्मा, इक्बाल, दिनकर ही त्यांची कवितेतील प्रेरणास्थाने आहेत. त्यांना पद्मश्री, साहित्य अकादमी, साहित्य अकादमीचा हिंदी संचालनालय पुरस्कार, केंद्राची विद्यावृत्ती असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. दुग्गर साहित्यरत्न, डोगरा रत्न सन्मान त्यांना मिळाला आहे. जित्तो, दिवाण ए गझल, डुग्गर नामा, गीतगंगा, थेरा हुआ कोठरा, छन्नी, दे दो एक बसंत, एक शेहर यादों का, बस्ती बस्ती, दिल दरियाँ खाली खाली, फूल उदास हैं, दिल होया दरवेश ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. त्यांनी डोगरी साहित्याचा इतिहास व डोगरा संस्कृतीचा इतिहास लिहिला आहे. विशेष म्हणजे ५० वर्षे त्यांनी डोगरी, हिंदूी, उर्दू व पंजाबी या भाषा समृद्ध करतानाच संस्कृती संवर्धनातही मोलाची भर टाकली आहे. उर्दूची नजाकत, पारंपरिक डोगरी भाषेचा गोडवा असा अनोखा संगम त्यांच्या साहित्यकृतीत दिसून येतो. किमान तीन ते चार भाषात पारंगत असल्याने त्यांनी भाषा-भगिनींना जोडण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे, जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये ही नेहमी देशापासून अलिप्त वाटतात, त्या राज्यांमधील फार थोडय़ा लोकांना देशपातळीवर प्रसिद्धी मिळते, डॉ. उधमपुरी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने साहित्य क्षेत्रातील ही उणीव काही अंशी भरून निघाली आहे.