खगोल-भौतिकशास्त्रातील मोजक्या संशोधक महिलांपैकी एक म्हणजे जोआन फेनमन. नोबेल विजेते रिचर्ड फेनमन यांच्या भगिनी अशी त्यांची ओळख. त्यांच्या आईने लहानपणी, बायकांचा मेंदू विज्ञानासाठी नसतोच, त्यामुळे शास्त्रज्ञ वगैरे होण्याच्या भानगडीत पडू नकोस असाच सल्ला दिला होता!  तो झुगारल्यानेच त्या एवढे मोठे यश मिळवू शकल्या. लहानपणापासून रिचर्ड त्यांच्याकडून आकडेमोड, वैज्ञानिक कोडी वगैरे सगळा अभ्यास गमतीदार पद्धतीने करून घेत असे. पण आता हा सगळा इतिहास झाला आहे कारण नुकतेच जोआन यांचे निधन झाले. जोआन यांनी सौरडागांची शक्यता प्रथम व्यक्त केली होती. अवकाशयानावर किती उच्च ऊर्जाकण आदळू शकतात याचा अंदाज त्यांनी मांडल्याने उपग्रह, अवकाशकुप्या यांची रचना करणे सोपे झाले. सूर्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ध्रुवीय प्रकाश हे त्यांचे अभ्यासाचे विषय. उत्तर गोलार्धातील अरोरा बोरिअ‍ॅलिस तर दक्षिण अर्धगोलार्धातील अरोरा ऑस्ट्रॅलिस प्रकाशशलाका त्यांनी शोधल्या होत्या. हा प्रकाश रात्रीचा आसमंत उजळत असतो. सहा दशकांच्या खगोल संशोधनानंतर त्या हवामान बदलांकडे वळल्या. अनेक देशांच्या नामवंत वैज्ञानिक संस्थांसाठी त्यांनी संशोधन केले, त्यात नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचा समावेश होता. त्यांचे वैज्ञानिक म्हणून यश वेगळेच असले तरी त्यांची प्रेरणा त्यांचा भाऊ रिचर्ड फेनमन हाच होता. तो १४ वर्षांचा असताना त्याने घरीच इलेक्ट्रॉनिक प्रयोगशाळा तयार करून जोआनला तिथे संशोधनाला बसवले होते, त्यासाठी तो तिला पैसेही देई. मग, तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी भावाने तिला ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ नावाचे पुस्तक वाढदिवशी भेट दिले. त्या वेळी तिला समजले की, विज्ञानात कामगिरी करायची म्हणजे मारी क्युरीच बनायला पाहिजे असे नाही; विज्ञानाचे क्षितिज खूप मोठे आहे. मग तिने खगोलभौतिकशास्त्र निवडले.  ओबेरलिन व सायराक्युज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर तिच्या शिक्षकांनी तू कोळिष्टकांवर शोधनिबंध लिही, कारण घरकाम करताना ती भरपूर सापडतात, असा उपरोधिक सल्ला दिला होता. तरी तिने १९५८साली विद्यावाचस्पती पदवी घेतली. ‘गृहिणी’ म्हणून नैराश्य येत गेले. एका मनोविकारतज्ज्ञाने त्यांना लॅमाँट डोहर्थी पृथ्वी वेधशाळेत अर्ज करण्यास सांगितले, त्यात त्यांना नोकरी मिळाली. तिथून पुढची कारकीर्द सुरू झाली. भावानेच एकदा तिला ध्रुवीय प्रकाश दाखवला, त्यातून तिला संशोधनाची दिशा मिळाली. त्यांनी लिहिलेले ‘अ पॅशन फॉर सायन्स – स्टोरीज ऑफ डिस्कव्हरी अँड इनव्हेन्शन’ हे पुस्तक बरेच गाजले.  सौरकण पृथ्वीच्या चुंबकीय आवरणातून येण्याचा उलगडा त्यांनी केला. नासाचा उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार त्यांना मिळाला होता.