फाळणीचे साक्षीदार असलेले संवेदनशील उर्दू लेखक  जोगिंदर पॉल यांचे लेखन पाकिस्तानातही लोकप्रिय होते. ख्यातनाम उर्दू कथा-कादंबरीकार व लेखक ही त्यांचे ओळख. पॉल यांच्या निधनाने उर्दू साहित्यातील एक कसदार लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

त्यांचा जन्म १९२५ मध्ये आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे झाला. पॉल यांच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय असला तरी त्यांना मात्र इंग्रजी आणि उर्दू साहित्यात विशेष रस होता. इंग्रजी विषयात एमए केल्यानंतर १९५४ मध्ये एका नातेवाईकाच्या माध्यमातून ते केनियाला गेले. तेथील शिक्षणखात्यात  अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथेच त्यांचा विवाह कृष्णा यांच्याशी झाला. काही वर्षे केनियात काढल्यानंतर ते भारतात परतले. अध्यापनाची आवड असल्याने ते हैदराबाद येथे एका महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. त्या सुमारास औरंगाबादच्या सरस्वती भुवन संस्थेचे एक अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांच्या ते संपर्कात आले. भाईंनीच मग त्यांना  औरंगाबादेत आणले. १९६२ मध्ये पॉल  हे    स. भु. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि दोनच वर्षांत ते प्राचार्य बनले. कृष्ण चंदर, नामवर सिंह, कमलेश्वर अशा अनेक साहित्यिकांशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.  तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या आग्रहावरून तरक्कीपसंद (सुधारणावादी) उर्दू लेखकांच्या एका प्रातिनिधिक कथासंग्रहाचे त्यांनी संपादनही केले होते.  १९७६  मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते   दिल्लीस गेले. पॉल यांनी धरती का काल (१९६१), मं क्यूं सोकुम, (१९६२), माती का इद्रक (१९७०), खुडू बाबा का मकबरा (१९९४), परिंदे (२०००), बस्तियाँ (२०००)  हे लघुकथासंग्रह  लिहिले. नही रेहमान बाबू, अमद वा रफ्त (१९७५), बयानात (१९७५), मुहावरा (१९७८), इराडा (१९८१), नादीद या इतर साहित्यकृतीही तितक्याच गाजल्या. त्यांनी त्यांच्या लेखनातून सामाजिक अनिष्ट बाबींवर प्रहार तर केले पण त्यांच्या व्यक्तिरेखाही जीवनात संघर्ष करताना दिसतात. त्यांची मातृभाषा पंजाबी पण प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उर्दूतून झाले, त्यामुळे या भाषेची गोडी त्यांना लागली. उर्दू ही भाषा नाही तर संस्कृती आहे असे ते सांगत असत. तोलून मापून शब्दांचा वापर, चेहऱ्यावर विलसलेले हास्य, कॉटनचा कुर्ता, दोन बोटात सिगारेट असे लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व. त्यांचे प्रत्येक वाक्य विद्वताप्रचुर असायचे.

दक्षिण दिल्लीत ते राहत होते. उजवीकडे गालिब व सआदत हसन मंटो यांची चित्रे तर बाजूला हळूच डोकावणारी कृष्णाची छबी अन् कबीरही. यातून कळते ती पॉल यांची अभिरुची. इंग्रजी भाषेत भारतामध्ये सकस साहित्य निर्माण झाले नाही, असेच त्यांचे मत होते. मंटो उत्तमच, इस्मत चुगताईंचे लेखन चांगले पण मंटोच्या तोडीचे नाही असे ते सांगत. भााषाशुद्धीचा, शैलीदार लेखनाचा आग्रह पॉल यांनी नेहमीच धरला. दिल्लीने अनेक ठिकाणांहून आलेल्या स्थलांतरितांना खुणावले त्यात ते एक होते.