अतिवाहकता म्हणजे सुपरकंडक्टिव्हिटी हा काही पदार्थाचा गुणधर्म आता नवीन राहिलेला नाही. अतिवाहक पदार्थाचा विद्युतरोध जवळपास शून्य असल्याने त्यात विजेची हानी टळते, पण सर्वसामान्य तापमानाला कुठलाही पदार्थ अतिवाहक (सुपरकंडक्टर) नसतो त्यामुळे पदार्थात अतिवाहकतेचा गुण आणणे हे आव्हान आहे. अतिवाहकता संकल्पना १९७० च्या सुमारास स्पष्टपणे अस्तित्वात आली, ती ‘बीसीएस सिद्धांत’ म्हणजे बार्डीन, कूपर, श्रीफर सिद्धांत म्हणून! या सिद्धांतासाठी  १९७२ मध्ये तिघांना नोबेल मिळाले. यातील जॉन रॉबर्ट श्रीफर यांचे नुकतेच निधन झाले. अतिवाहकतेचे सर्वात यशस्वी असे पुंजभौतिकीवर आधारित स्पष्टीकरण त्यांनी केले होते.

श्रीफर यांचा जन्म इलिनॉयमधील ओक पार्कचा. त्यांचे कुटुंबीय १९४० मध्ये न्यूयॉर्कला व नंतर फ्लोरिडात आले. लहानपणी कागदी रॉकेटे, पुढे हॅम रेडिओ या छंदांतून ते आधी विद्युत अभियांत्रिकीकडे, त्यानंतर भौतिकशास्त्राकडे वळले. जॉन स्लॅटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जड अणूंवर आधारित छोटा प्रबंधही सादर केला होता. नंतर इलिनॉय विद्यापीठात जॉन बार्डिन यांचे सहायक म्हणून, विद्युत वहनातील सैद्धांतिक प्रश्नांवर त्यांनी काम केले. मग बार्डिन व लिऑन कूपर यांच्या समवेत ते अतिवाहकतेच्या संशोधनात सहभागी झाले. अतिवाहक अणूंची गणिती मांडणीही त्यांनी केली होती. तो काळ १९५७ चा. अतिवाहकतेतील ‘कंडेन्सेट’ संकल्पना त्यांना न्यूयॉर्कमधील भुयारी रेल्वेत सुचली, त्यांनी ती लगेच लिहून काढली. १९२० ते १९५७ पर्यंत अतिवाहकतेची सैद्धांतिक मांडणी करता आली नव्हती ती यातून शक्य झाली. अतिवाहक पदार्थातील इलेक्ट्रॉन हे विशिष्ट जोडय़ांनी काम करतात त्यांना ‘कूपर जोडय़ा’ असे म्हणतात. यातूनच पुढे बीसीएस सिद्धांत उदयास आला. तीस वर्षांच्या प्रायोगिक निष्कर्षांना सैद्धांतिक रूप देण्यात या तिघांना यश मिळाले. काही काळ श्रीफर हे ब्रिटिश नॅशनल सायन्स फाउंडेशन व कोपनहेगनच्या नील्स बोहर संस्थेत होते. मायदेशी परतून त्यांनी इलिनॉय विद्यापीठात अध्यापन केले. ‘थिअरी ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.  १९७२ मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाल्यावर ते कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापन करीत होते. १९९२ मध्ये फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत मानद प्राध्यापक झाले. नॅशनल हाय मॅग्नेटिक फील्ड लॅबोरेटरीचे ते प्रमुख होते व कक्ष तापमानाला अतिवाहकता मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू राहिले.

त्यांच्या आयुष्यात एक डाग मात्र राहिला तो म्हणजे २००५ मध्ये त्यांच्या गाडीखाली कॅलिफोर्नियात एकजण ठार, तर सात जखमी झाले होते. त्यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगात जावे लागले होते.