20 September 2018

News Flash

सर जॉन सुल्स्टन

जनुकीय संशोधनात ब्रिटनची नाममुद्रा उमटवणारे ते प्रमुख वैज्ञानिक.

सर जॉन सुल्स्टन

मानवी जनुकीय आराखडय़ाचे कोडे उलगडण्यात अनेक वैज्ञानिकांचा वाटा आहे, त्यात ब्रिटिश वैज्ञानिकांचाही समावेश होता. सर जॉन सुल्स्टन हे त्यापैकीच एक. जनुकीय संशोधनात ब्रिटनची नाममुद्रा उमटवणारे ते प्रमुख वैज्ञानिक. त्यांचे नुकतेच निधन झाले.  सी एलेगन्स या गोलकृमीवरील प्रयोगातून कर्करोगाच्या उत्पत्तीबाबतच्या संशोधनासाठी २००२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 32 GB Black
    ₹ 59000 MRP ₹ 59000 -0%
  • Lenovo K8 Plus 32GB Fine Gold
    ₹ 8184 MRP ₹ 10999 -26%
    ₹410 Cashback

त्यांनी या क्षेत्रात अनेक संस्थाही उभ्या केल्या. त्यात केम्ब्रिजमधील वेलकम ट्रस्ट सँगर इन्स्टिटय़ूटचा समावेश आहे. या संस्थेमार्फत, त्यांनी जनुकीय आराखडय़ाची माहिती सर्वाना खुली करून दिली. जित्याजागत्या सजीवांच्या संशोधनासाठी त्यांनी आगामी काळातील दिशा ठरवून दिली होती. जनुकीय संशोधन सर्वाना उपलब्ध करून त्यांनी मानवतेची मोठी सेवा केली असेच म्हणावे लागेल. आताच्या काळात सर जॉन सुल्स्टन यांचे कट्टर विरोधक म्हणजे प्रा. क्रेग व्हेन्टर. व्हेन्टर यांनी खासगी माध्यमातून जनुकीय आराखडय़ावर संशोधन करून काही पेटंट घेतली होती. २००२ पासून सुल्स्टन व व्हेन्टर यांच्यात सतत वाद होत राहिले. सुल्स्टन यांच्या संशोधनाने जनुकीय तंत्रज्ञानाचा विकास खुंटला असा बेजबाबदार आरोप व्हेन्टर यांनी केला होता. सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन व खासगी क्षेत्रातील संशोधन असा मोठा संघर्ष या दोघांमध्ये होता. सुल्स्टन यांनी शोधून काढलेल्या जनुकांचे पेटंट व्हेन्टर यांना घेता येत नसे त्यामुळे ते सुल्स्टन यांच्यावर चिडून होते. स्वाइन फ्लू व इतर रोगांवर उपयुक्त असलेले टॅमिफ्लू हे औषध पेटंटच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सुल्सटन यांनी लढा दिला. खासगी कंपन्यांनी संशोधनात लुडबुड करण्याचे कारण नाही. सगळे संशोधन हे विद्यापीठांत झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

सर जॉन यांना २०१७ मध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी इंग्लंडच्या राणीकडून गौरवण्यात आले. सँगर सेंटरचे संचालक म्हणून १९९२ पासून त्यांनी, ब्रिटनच्या वेलकम ट्रस्टच्या प्रयोगशाळेतही बरेच काम केले. उतारवयातही ते तरुण संशोधकांशी बोलत. आतापर्यंत सहा हजार रोगांवर नवीन माध्यमातून उपचार शोधण्यात सुल्स्टन यांच्या संस्थेने केलेले संशोधन कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय जनुकीय आराखडय़ाच्या प्रकल्पात त्यांचा मोठा वाटा होता. माहितीस्वातंत्र्याच्या प्रेमातून त्यांनी विकिलिक्सचा प्रमुख ज्युलियन असांज याच्या जामिनासाठी रक्कम भरली होती अर्थात ती बुडाली हा भाग वेगळा. रॉयल सोसायटीचे फेलो असलेल्या सुल्स्टन यांनी जनुकशास्त्रात केलेले पायाभूत काम पुढील अनेक पिढय़ांना प्रेरणा देणारे राहील यात शंका नाही.

First Published on March 13, 2018 1:44 am

Web Title: john sulston british biologist