जोसेफ फ्रेड्रिक ऊर्फ जो सटर यांचा विमान हाच ध्यास आणि श्वास होता. एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास करतानाही विमानाचे भाग सुटे करायचे, त्याचे निरीक्षण करायचे आणि पुन्हा जोडायचे यातच ते रमून जात. यातूनच मग बोइंग कंपनीत तब्बल चार दशकांहून अधिक काळ काम करताना त्यांनी ७४७ विमानाच्या इंजिनमध्ये जे आमूलाग्र बदल केले त्यामुळे त्यांची बोइंग ७४७चे जनक हीच ओळख बनली.

वॉशिंग्टनच्या सिएटल भागात त्यांचा जन्म झाला. बोइंग कंपनीचा विशालकाय प्रकल्प त्यांच्या घरानजीक असल्याने  विमानांच्या सहवासात ते मोठे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश घेतला तो एरोनॉटिकल इंजिनीअरिंग शाखेत. १९४०च्या दशकात विद्यापीठाला सुट्टी असल्याने बोइंगच्या एका प्रकल्पात अर्धवेळ काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांच्या आवडीच्याच कंपनीत काम मिळाल्याने संधीचे सोने करून त्यांनी वरिष्ठांची मने जिंकली. मग पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी डग्लस एअरक्राफ्ट कंपनीत नोकरी केली. पण तेथे जादा पगार असूनही त्यांनी कमी पगारावर बोइंगमध्ये येणे पसंत केले. कंपनीने त्यांना कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू करून घेतले. तेथे काम करीत असताना त्यांनी ७४७ जम्बो जेट विमानांच्या इंजिनाच्या अभिकल्प आणि रचनेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्याने दूर अंतराच्या प्रवासासाठी ते खूप लाभदायी ठरले. यामुळेच ते बोइंगचे मुख्य अभियंता बनले. बोइंग ७४७ने मग इतिहास घडवला. ७४७ विमानाची व त्याच्या इंजिन क्षमतेवर हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुकाचा वर्षांव सुरू केला. जगभरातील विमान वाहतूक कंपन्यांकडून ७४७ विमानांना मागणी वाढू  लागल्याने कंपनीची भरभराट झाली. या विमानाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून एका वरिष्ठाने कंपनीतील अनेक अभियंत्यांना काढून टाकण्याचा आदेश जो यांना दिला होता. तो त्यांनी झुगारून दिलाच पण विमानाचा दर्जा कायम ठेवायचा असेल तर आणखी काही अभियंते नव्याने घ्यावे लागतील, असेही त्यांना ठणकावून सांगितले. कंपनीने त्यांची ही मागणी अर्थातच मान्य केली. कंपनीने मग त्यांना कार्यकारी उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर नेमले.  ६५व्या वर्षी ते कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाले तरी सल्लागार म्हणून पुढेही अनेक वर्षे ते बोइंग कंपनीशी निगडित राहिले.

सहाहून अधिक दशके ते हवाई वाहतूक क्षेत्रात राहिले. चॅलेंजर हे ‘नासा’चे अवकाशयान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अमेरिकी प्रशासनाने नेमलेल्या रॉजर्स आयोगावरही त्यांनी काम केले. इंटरनॅशनल एअर कार्गो असोसिएशनसह अनेक संस्थांचे पुरस्कार जो यांना मिळाले. बोइंग कंपनीने त्यांनी बजावलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून ज्या ठिकाणी विमाने बनतात त्या इमारतीला जो यांचे नाव दिले. हवाई वाहतूक क्षेत्रात जिवंतपणीच दंतकथा बनून गेलेल्या या अभियंत्याचे ९५व्या वर्षी निधन झाल्याची बातमी बुधवारी आल्यानंतर अनेकांनी या क्षेत्रातील एक सर्वोत्तम अभियंता गेला, अशीच भावना व्यक्त केली.