दिल्लीतील निर्भयाकांडानंतरही अजून बलात्काराची १ लाख ३३ हजार प्रकरणे न्यायालयात पडून आहेत आणि न्यायालयापर्यंत न गेलेल्या तक्रारी, तक्रारच न करणे यांची संख्या त्याहून काही पटींनी मोठी आहे. प्रसारमाध्यमात या घटनांचे येणारे वार्ताकनही अनेकदा सदोष असते. या पाश्र्वभूमीवर प्रसंगी जीव धोक्यात घालून भारतातील बलात्काराच्या घटनांवर सहा वर्षे वार्ताकन करणाऱ्या पत्रकार प्रियंका दुबे यांना चमेलीदेवी जैन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्या बीबीसीच्या दिल्ली ब्यूरोत द्वैभाषिक पत्रकार असल्या, तरी पुरस्कार त्यांच्या पुस्तकाला मिळाला आहे. ‘नो नेशन फॉर विमेन- रिपोर्टिग ऑन रेप फ्रॉम इंडिया- वर्ल्डस् लार्जेस्ट डेमोक्रसी’ हे ते पुस्तक. ते सिद्ध होण्याआधी त्यांनी प्रसंगी पुरुषांनी केलेल्या गैरवर्तनास तोंड देत बलात्कारच नव्हे तर महिलांवरील अन्यायाच्या अनेक घटनांना वाचा फोडणाऱ्या बातम्या दिल्या. त्यांच्या वार्ताकनात शोधपत्रकारितेचा भाग अधिक आहे.

बलात्कार हे केवळ लैंगिक वासना या एकाच कारणातून होत नाहीत तर त्यात पुरुषी अहंकार व जातवर्चस्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो असे निरीक्षण त्यांनी पुस्तकात नोंदवले आहे. बलात्कारपीडित महिला, त्यांचे कुटुंबीय यांच्याशी बोलून बातम्या देण्यावर न थांबता, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रियंका यांनी लढा दिला. त्यांनी हे वार्ताकन करताना दृश्यफिती न करता ध्वनिफिती तयार केल्या, कारण कॅमेऱ्यासमोर महिलांना अवघडल्यासारखे होते. ध्वनिफिती ऐकून, स्वत: काढलेल्या छायाचित्रांच्या मदतीने त्यांनी पुस्तक लिहिले. प्रियंका दुबे या मूळ भोपाळच्या, ‘मुलीने पत्रकारिता करणे’ पसंत नसलेल्या कुटुंबातल्या! तरी त्यांनी हा काटेरी मार्ग निवडला. हे सगळे करीत असताना अनेकदा त्यांना नैराश्यानेही ग्रासले तरी त्यांनी ध्येय सोडले नाही. जमावाने केलेल्या हिंसाचाराच्या बातम्यांची मालिका, उत्तर प्रदेशातील खोटय़ा चकमकी, आदित्यनाथांच्या साम्राज्यात असहाय मातांचे वेदनामय जीवन, अशा अनेक बातम्यांमुळे त्यांची पत्रकारिता धारदार बनली.

गेली नऊ  वर्षे इंग्रजी व हिंदी भाषांतून त्यांनी पत्रकारिता केली. हिंदी पत्रकारितेचा उच्च दर्जा समाजासमोर येत नाही हे त्यांचे शल्य असले तरी अखेर या पुरस्काराने त्यांच्या उमेदीवर शिक्कामोर्तब झाले आहे.