दोघेही म्यानमारमध्येच जन्मले, वाढले. दोघेही पत्रकार. वा लोन आता ३३ वर्षांचा आहे आणि त्याचा सहकारी क्याव सो ऊ हा आत्ता तिशीच्या उंबरठय़ावर आहे. या दोघांना गेल्या वर्षीच ‘टाइम’च्या ‘वर्षांतील व्यक्ती’ यादीत स्थान मिळाले होते. ‘पेन आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ही मिळाला होता.. त्यावर कळस चढला आहे तो अलीकडेच या दोघांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला गेलेल्या ‘गुएर्मो कानो वृत्तपत्र-स्वातंत्र्य पुरस्कारा’मुळे! २५ हजार डॉलरचा, जागतिक प्रतिष्ठेचा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दोघेही येऊ शकले नाहीत, कारण गेल्या काही महिन्यांपासून ते सात वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत.

म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या एका सशस्त्र गटाने काही सैनिकांवर हल्ला चढवल्याचे निमित्त करून ‘खणखणीत सूड’ घेणारे मोठे हत्याकांडच म्यानमारच्या सुरक्षा दलांनी सप्टेंबर २०१७ मध्ये घडविले. या ‘इन डिन हत्याकांडा’त अत्याचार कसे झाले, हे वा लोन आणि क्याव सो ऊ यांनी उघड केले.

हे दोघे स्थानिक असले, तरी ‘रॉयटर्स’ या जगव्यापी वृत्तसंस्थेसाठी वार्ताकन करीत होते. त्यांना ‘संध्याकाळी जेवायला’ बोलावून सुरक्षा दलांनी पकडले. ‘तुमच्या बातमीपत्रांमुळेच रोहिंग्यांना चिथावणी मिळाली’ असा आरोप म्यानमार सरकारने त्यांच्यावर ठेवला. हे आरोप त्यांनी नाकबूल केलेच, पण वृत्तसंस्थेनेही हे प्रकरण लावून धरले. जागतिक दबाव आणला. तरीही दोघे डांबलेल्याच अवस्थेत राहिले. ‘आम्ही काहीही चूक केलेली नाही’ असेच म्हणत राहिले. सरकारपुढे न झुकता त्यांनी तुरुंगवास पत्करला. रोहिंग्यांवरील अत्याचार अनन्वितच होते, हे सांगणारे निवेदन या दोघांनी कोठडीतूनही दिले.

यापैकी वा लोन हा शेतकऱ्याचा मुलगा. श्वेबो जिल्ह्य़ातील खेडय़ातून शिक्षणासाठी काकांच्या आश्रयाला मोलमीन शहरात आला आणि २०१० पासून यांगूनमध्ये (पूर्वी रंगून) छायापत्रकार म्हणून काम करू लागला. अधूनमधून लिहायचा, लिखाण बरे म्हणून पत्रकारही झाला. ‘म्यानमार टाइम्स’ या त्या देशातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रात गेला आणि तेथून ‘रॉयटर्स’मध्ये. म्यानमारची लष्करशाही संपुष्टात येणे, आँग सान सू क्यी यांची लोकशाही पद्धतीने झालेली निवड यांचे वृत्तांकन त्याने केले. हे सारे करीत असताना, वृत्तपत्र-स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी संघटन-कार्यदेखील वा लोन करीत असे.

क्याव सो ऊ हा त्यामानाने तरुण आणि अननुभवीदेखील. तो वृत्तीने कवी. कवितांसोबत कथा आणि कादंबरीही लिहिण्याची त्याची आस. लिखाणाच्या क्षेत्रातील नोकरी म्हणून पत्रकारितेत आला. रोहिंग्यांवरील अत्याचार पाहून अस्वस्थ होऊ लागला. पोरगेल्याशा या तरुणाने अत्याचारांची व्याप्ती नेमकी किती आहे, हे खणून काढले. ‘तो सरकारविरुद्ध कट कसला करणार? कुणाच्याही विरुद्ध विचार त्याच्या मनात कधी येत नाही,’ अशा शब्दांत त्याच्या हळवेपणाचा उल्लेख त्याची बहीण, पत्नी करतात. पण वा लोन यांच्या साथीने त्याने सत्तेची क्रूरकर्मे वेशीवर टांगली, हे खरे.