कलाकाराच्या आयुष्यात एखादीच भूमिका अशी येते, की त्याला ती आयुष्यभर साथ देत राहते. तीच त्याची ओळखही ठरते. जुगल किशोर यांना पन्नाशी उलटल्यावर ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटात मिळालेली भूमिका सर्वाच्याच लक्षात आली आणि त्यापूर्वी ३० वर्षे रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या माध्यमांमध्ये त्यांनी केलेल्या अनेकरंगी भूमिकांनाही आपोआप उजाळा मिळत गेला. ‘दबंग टू’ या लोकप्रिय चित्रपटातही त्यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती आणि त्यामुळे आता पुढील काळ अधिक आव्हानात्मक ठरणार होता. अशाच वेळी त्यांचे निधन होणे ही दु:खद घटना म्हटली पाहिजे.
गेल्या ३० वर्षांत रंगभूमीच्या क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि संशोधन अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी काम केले. हिंदी रंगभूमीच्या क्षेत्रात नावाजलेले नाव असले, तरीही भारतभर नाव होण्यासाठी चित्रपटाचे माध्यमच अधिक प्रभावी ठरते. लखनऊच्या भारतेन्दु नाटय़ अकादमीतून नाटय़कलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे १९८६ पासून तेथेच अभिनयाचे प्राध्यापक झालेल्या जुगल किशोर यांनी लुप्त होत चाललेल्या ‘भांड’ या लोकनाटय़ाचा विशेष अभ्यास केला. बुंदेलखंडात प्रसिद्ध असलेल्या ‘पई दंडा’ या तालबद्ध मार्शल आर्ट प्रकारावरही त्यांनी संशोधन केले व त्यास कलात्मक रीतीने रसिकांसमोर आणले. सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय विषयांवर आणि अगदी नौटंकी शैलीतही त्यांनी सुमारे ३० नाटकांचे दिग्दर्शन केले. एक आतंकवादी की मौत, ताशोंका देश, अंधेर नगरी, खोजा नसीरुद्दीन ही त्यातील काही अतिशय गाजलेली नाटके. भारतेन्दु नाटय़ अकादमीचे रंगमंडल प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना, त्यांनी रंगभूमीवर नवनवे प्रयोग केले. उत्तम साहित्याचे रंगरूपांतर करणे, ही नेहमीची तरीही अवघड गोष्ट. जुगल किशोर यांनी प्रेमचंद, कथालेखक अमरकांत अशा लेखकांच्या उत्तम कलाकृती मंचित केल्या. प्रेमचंदांच्या कथेवर आधारित त्यांनी ‘ब्रह्मा का स्वांग’ या नाटकाचे पाचशे प्रयोग केले. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल येत्या २६ नोव्हेंबर रोजी त्यांचा राष्ट्रीय नाटय़ समारोहात सन्मानही केला जाणार होता.
त्यांनी नियतकालिकांत प्रासंगिक लेखनही केले, ते संस्कृती व नाटक यांबद्दल अधिक असे.चित्रपट किंवा दूरचित्रवाणी ही माध्यमे अधिक लोकांपर्यंत पोहोचतात, हे खरे. परंतु खऱ्या नाटकवाल्याचा जीव रंगभूमीवरच रमतो. जुगल किशोर यांच्याबाबत नेमके असेच घडले. त्यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी रंगभूमीवरील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.