News Flash

जुन्को ताबेई

१९७०च्या दशकात जपानमध्येही पुरुषांनी बाहेर पडून कर्तृत्व गाजवावे व महिलांनी घरात बसावे

१९७०च्या दशकात जपानमध्येही पुरुषांनी बाहेर पडून कर्तृत्व गाजवावे व महिलांनी घरात बसावे, चहापाणी करावे अशी समाजाची धारणा रूढ होती. त्या काळात वयाच्या दहाव्या वर्षी एका मुलीने गिर्यारोहणात आपली कारकीर्द सुरू केली व नंतर एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी ती पहिली महिला ठरली; तिचे नाव जुन्को ताबेई. प्रत्येक खंडातील मिळून सात उच्च शिखरे सर करणारीही ती पहिलीच महिला. तिचे नुकतेच निधन झाले.

तिचा जन्म फुकुशिमातील मिहारूचा. गिर्यारोहणात तिला रस असला तरी तिचा महागडा छंद जोपासण्याइतका पैसा तिच्या कुटुंबीयांकडे नव्हता. तिचे शिक्षण १९५८ ते १९६२ दरम्यान शोवा विमेन्स युनिव्हर्सिटीत झाले. तेथे ती गिर्यारोहण क्लबची सदस्य होती. पदवी प्राप्त केल्यावर तिने जपानमध्ये १९६९ मध्ये महिलांचा पहिला गिर्यारोहण क्लब सुरू केला. ‘लेटस गो ऑन अ‍ॅन ओव्हरसीज एक्सपीडिशन बाय अवरसेल्व्हज’ हे त्या क्लबचे घोषवाक्य. नवरा मिळवण्यासाठी तिला गिर्यारोहणात फुकाचा रस आहे, असे टोमणेही तिला ऐकावे लागले. तोपर्यंत तिने जपानमधील माऊंट फुजी व स्विस आल्प्समधील मॅटरहॉर्न हे पर्वत सर केले होते. १९७२ मध्ये तिला गिर्यारोहक म्हणून जपानने मान्यता दिली. जपानी महिलांचे गिर्यारोहक पथक एको हिसाने यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट मोहिमेसाठी गेले; त्यात शिक्षक, संगणक प्रोग्रॅमर, बालसमस्या सल्लागार असे व्यवसाय करणाऱ्या सर्वसाधारण महिला होत्या, त्यात ताबेईचा समावेश होता. तिने व हिरोका हिराकावा यांनी १९७० मध्ये अन्नपूर्णा ३ शिखर सर केले. ताबेईने नंतर एव्हरेस्ट मोहिमेसाठी प्रायोजक मिळवण्याचा प्रयत्न केला; पण बायकांनी मुले सांभाळावीत, असे सांगून तिला हिणवले गेले. नंतर योमुरी शिंबून वृत्तपत्र व निपॉन टेलिव्हिजन यांनी अखेरच्या क्षणी त्यांना निधी दिला. तरीही त्यांना पदरमोड करावीच लागली. १९७५ मध्ये त्यांनी काठमांडूतून एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी ज्या मार्गाने एव्हरेस्ट सर केले त्याच मार्गाने चढाई केली व १६ मे १९७५ रोजी ताबेई एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला ठरली. १९९१ मध्ये तिने अंटाक्र्टिकातील माऊंट विल्सन सर केला. १९९२ मध्ये पनाक जया सर करून ती सात शिखरे सर करणारी पहिली महिला ठरली. परिसंस्थेविषयी ती जागरूक होती. तिने क्यूसू विद्यापीठातून एव्हरेस्टवरील पर्यावरण हानीवर पदव्युत्तर अभ्यास केला. हिमालयन अ‍ॅडव्हेन्चर ट्रस्टची ती संचालक होती. तिचे पती मसानोबू तबेई हे गिर्यारोहकच; त्यांची भेट १९६५ मध्ये एका मोहिमेत झाली. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. २०१२ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान होऊनही त्या जिद्दीने त्या रोगाशी लढत गिर्यारोहणाचा छंद जोपासत होत्या. एव्हरेस्ट सर केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे ३६. या मोहिमेत त्या हिमवादळात गाडल्या गेल्या, पण वाटाडय़ांनी त्यांना बाहेर काढले व नंतर १२ दिवसांनी जगातील महिलांसाठी ताबेईने अभिमानास्पद इतिहास घडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2016 3:38 am

Web Title: junko tabei mountaineer
Next Stories
1 सर डेव्हिड कॉक्स
2 डॉ. रेणू खटोड
3 नवदीपसिंग सूरी
Just Now!
X