07 July 2020

News Flash

न्या. होस्बेट सुरेश

मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९५३ पासून सत्र न्यायालयात साहाय्यक वकील म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली.

न्या. होस्बेट सुरेश

मते टोकाची पण तत्त्वभान पक्के असलेल्या व्यक्तींचा अनेकांशी संवादच तुटतो, मात्र निधनानंतर अशा व्यक्तींचे तत्त्वभानच आदर्श म्हणून उरते. अशा व्यक्तींपैकी निवृत्त न्यायमूर्ती होस्बेट सुरेश हे एक होते. गेल्या तीन दशकांत ‘मानवाधिकारवाले’ म्हणून अनेकदा त्यांची हेटाळणीच झाली. मूलभूत आणि नैसर्गिक मानवी अधिकार म्हणजे काय, समाजरचनेमुळे अन्याय कसा होतो, सरकारच्या कोणत्या नीती या अन्यायास दूर करू शकतात, याची जाणीव न्या. सुरेश यांना होती आणि त्यांनी अनेकांना ती दिली.

मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९५३ पासून सत्र न्यायालयात साहाय्यक वकील म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. सत्र न्यायालयात नोव्हेंबर १९६८ पासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश, तर १९७९ मध्ये द्वितीय अतिरिक्त प्रधान न्यायाधीश ही पदे त्यांनी सांभाळली, पण १९८० मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी हे पद सोडले. मुंबई उच्च न्यायालयात १९८६ पासून अतिरिक्त न्यायमूर्ती, तर १९८७ पासून कायम न्यायमूर्ती म्हणून १९९१ पर्यंत त्यांनी काम पाहिले. ‘मानवाधिकार आणि घटनादत्त मूलभूत अधिकार यांत फरक नाही’ हे सूत्र पाळूनच न्यायदान करीत असल्याने, ‘दोन्ही बाजूंना समान संधी’ देण्याऐवजी मानवाधिकाराची बाजू कोणती हे ओळखून ते काम करीत, असे अनुभव अनेक वकिलांनी कथन केले आहेत.

त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळात, १९९२ पासून देशात धर्मभेदवादाचे नवे, ‘प्रगत’ रूप दिसू लागले असताना त्यांनी अल्पसंख्याक समाजावरील अन्यायांचे स्वरूप नेमकेपणाने उघड केले. १९९३च्या मुंबई दंगलीपासून ते २००२च्या गुजरात दंगलीपर्यंत अनेक घटनांच्या लोकप्रणीत चौकशी समित्यांचे काम त्यांनी सांभाळले आणि या चौकशांना न्यायालयीन गांभीर्याची दिशा दिली.  कर्नाटक-तमिळनाडू कावेरी पाणीवाटप संघर्ष चिघळला तेव्हा याप्रकरणी लोकप्रणीत चौकशी समिती नेमली गेली. त्यात न्या. सुरेश होते. ते जन्माने कर्नाटकातले, मंगलोरच्या होस्बेट गावचे. पण अहवालात कर्नाटक सरकारच्या चुका त्यांनी परखडपणे दाखवून दिलेल्या होत्या. ‘दिल्ली परिसरातील १९८४ची शीखविरोधी दंगल काँग्रेस पक्षप्रणीत होती, त्याबद्दल बोला’ असे युक्तिवाद सुरू होण्यापूर्वीच १९८४च्या शिरकाणाचीही चिकित्सा करून त्यावरही त्यांनी टीका केली होती. मानवाधिकार आणि न्याय्य व्यवस्थेची मागणी करणाऱ्या चळवळींमधील प्रमुख कार्यकर्ते या नात्याने देशभरातील अनेक ठिकाणच्या अन्यायांवर त्यांनी बोट ठेवले.  कायद्याची कलमे, घटनेतील तरतुदी, न्यायालयीन प्रक्रियेतून आलेली न्यायविधाने यांच्या अभ्यासाइतकेच सामाजिक स्थितीची आरपार जाणीव असलेले न्यायक्षेत्रातील कार्यकर्ते, म्हणून न्या. होस्बेट सुरेश यांचे नाव नेहमीच घेतले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 12:01 am

Web Title: justice hosbet suresh profile abn 97
Next Stories
1 ए. वैद्यनाथन
2 वामनराव तेलंग
3 डॉ.ऑलिव्हर ई. विल्यमसन
Just Now!
X