रस्त्यावरील अपघातात कुणी गंभीर जखमी होऊन पडले असता, वेळीच वैद्यकीय मदतीने त्या व्यक्तीचे प्राण वाचणे शक्य असले तरी पोलिसी ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या भीतीने कुणी मदत करण्याच्या भानगडीत पडत नसे. पण २०१६ मध्ये ‘सेव्ह लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अशा वेळी मदत करून देवदूताची भूमिका पार पाडणाऱ्यांना लाभदायी ठरला. त्यानुसार आता अशी मदत करणाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. या सगळ्या प्रकरणात बराच अभ्यास स्वयंसेवी संस्थेने केला होता, त्याचे खरे श्रेय सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या इंदू मल्होत्रा यांना होते. आज त्याच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाल्या आहेत.  वकिलांमधून थेट निवड झालेल्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश.

इंदू मल्होत्रा यांचे वडील ओमप्रकाश मल्होत्रा हेही सर्वोच्च न्यायालयात वकील होते. इंदू यांचा जन्म १९५६ मध्ये बंगळूरुत झाला. त्यांचे बालपण दिल्लीत गेले. तेथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले. पदव्युत्तर पदवी त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमधून राज्यशास्त्रातून घेतली.नंतर दिल्ली विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेतले. १९८८ मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाची अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड ही परीक्षा सुवर्णपदकासह उत्तीर्ण झाल्या.  फातिमा बिवी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. त्यानंतर सुजाता मनोहर, रूमा पाल, ग्यानसुधा मिश्रा, रंजना देसाई, न्या. भानुमती या महिला न्यायाधीश झाल्या. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळांच्या प्रकरणात जी विशाखा समिती नेमण्यात आली त्यात इंदू मल्होत्रा या सदस्य होत्या. आतापर्यंतच्या अनेक खटल्यांत विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख केला जातो. त्या पायाभूत मार्गदर्शक तत्त्वात इंदू यांचा मोठा वाटा आहे. न्यायालयांमध्ये होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी दहा सदस्यांची समिती नेमली होती त्यातही इंदू यांचा समावेश होता. न्या. रंजना देसाई यांच्या २०१४ मधील निवृत्तीनंतर भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात होत्या. आता इंदू मल्होत्रा यांच्या नेमणुकीने महिला न्यायाधीशांची संख्या दोन झाली आहे. आतापर्यंत इंदू मल्होत्रा यांनी ज्या खटल्यात वकिली केली ते बहुतांश सार्वजनिक हिताचेच होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयात संधी मिळाली असली तरी सर्वसाधारणपणे निकालात वरिष्ठ न्यायाधीशांचाच वरचष्मा असतो. असे असले तरी मल्होत्रा यांनी लिंगभाव समानतेवर केलेले काम बघता त्यांचा समानतेचा बाणा न्यायदानातही दिसेल अशी अपेक्षा सर्वानाच आहे.