भारतीय न्यायपालिका १२ जानेवारी २०१८ हा दिवस कधीच विसरणार नाही. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे संवेदनशील प्रकरणांच्या सुनावणीचे खंडपीठ निश्चित करताना प्रचलित नियमांचा भंग करतात, असा आरोप  सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी  तेव्हा केला होता. न्यायपालिकेत सुधारणा झाली नाही तर लोकशाहीच धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.  या चार न्यायाधीशांमध्ये न्या. रंजन गोगोई यांचाही समावेश होता. भावी सरन्यायाधीश म्हणून त्यांचे नाव घेतले जात असतानाही न्या. मिश्रा यांच्या कार्यशैलीवर त्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांना हे पद मिळणार नाही असेच तेव्हा बोलले गेले. पण भविष्यात मिळणाऱ्या पदोन्नतीची फिकीर न करता न्या. गोगोई यांनी तेव्हा न्यायपालिकेतील खटकणाऱ्या बाबींवर भाष्य केले. मात्र बुधवारी देशाचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून त्यांचाच शपथविधी झाला.  ईशान्य भारतातून या पदावर नियुक्त होणारे ते पहिलेच न्यायाधीश ठरले.

आसामच्या संपन्न घराण्यात गोगोई यांचा जन्म झाला. १८ नोव्हेंबर १९५४ ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील के सी गोगोई हे आसाममधील नामवंत वकील, पुढे ते राजकारणात आले आणि आसामचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी भूषवले. १९७८ मध्ये रंजन गोगोई यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. २००१ मध्ये सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती केली. दहा वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. वर्षभरानंतर, २३ एप्रिल २०१२ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.    सर्वोच्च न्यायालयातील त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मरकडेय काट्जू यांनी एका पोस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयावरच टीका केली.  न्या. गोगोई यांनी न्या. काट्जू यांना त्या पोस्टबद्दल माफी मागायला लावली होती. मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या खंडपीठातही ते होते.  रिलायन्स कंपनीने गुजरातमध्ये ठिकठिकाणी मोबाइल टॉवर्स उभारल्याने सरकारने त्यावर १३ कोटींचा कर लावला होता. हा कर अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, यासाठी कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. गोगोई यांनी  ही याचिका फेटाळून लावली होती. आपल्या मालमत्तेचा तपशीलही ते नियमितपणे जाहीर करत असतात. मला सरकारी गाडी असल्याने माझ्या नावावर वाहन नाही. तसेच दिल्लीमध्ये घरही नाही. शेअर खरेदीत मी पैसा गुंतवलेला नाही असे त्यांनी या तपशीलात नमूद केले आहे.  न्या. गोगोई यांच्या नियुक्तीने योग्य व्यक्ती संवेदनशील पदावर आली याचा आनंद सर्वानाच झाला असेल..