स्वत: संगीत साधना के ली आहे, असे काही नाही,  घरातच सगळे जण संगीत शिकत आहेत, असेही नाही, तरी कृ. गो. धर्माधिकारी यांनी पाच दशकांपूर्वी पुण्यात ‘गानवर्धन’ या संगीतातील स्वयंसेवी संस्थेची स्थापना के ली. उदात्त हेतूने  स्थापन झालेली ही संस्था आजतागायत विशिष्ट शिस्तीत सुरू राहिली याचे कारण धर्माधिकारी यांचा स्वभाव. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच व्हायला हवी, यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या धर्माधिकारींनी अर्थार्जनासाठी  खासगी कं पनीत नोकरी करून उरलेला प्रत्येक क्षण संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठीच वेचला. त्यामुळेच ‘गानवर्धन’ नावारूपाला आली. अभिजात संगीताच्या क्षेत्रात नव्याने शिकणाऱ्या प्रत्येकाला सर्वात मोठी अडचण असते, ती स्वरमंच मिळण्याची. नवाच असल्याने कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही आणि स्वत:हून किं वा अन्य कोणीही कार्यक्रम करायचे ठरवले, तर किमान पंचवीस-तीस हजारांचा खर्च. त्यात कलावंताच्या मानधनाचा विचारही नाहीच. अशा नव्यांच्या गाण्याला तिकीट काढून कोण येणार आणि त्यासाठी प्रायोजकत्व तरी कोण देणार? धर्माधिकारी यांनी हीच अडचण हेरली आणि नवोदितांना आधार देण्यासाठीच संस्था सुरू के ली. त्यासाठी घरोघर जाऊन रसिक शोधून काढले. त्यांच्याकडून वार्षिक वर्गणी गोळा केली. ती मिळावी यासाठी वर्षांत मोठय़ा कलावंतांचेही कार्यक्रम आयोजित करण्याची हमी दिली. हमी किती, तर ‘गानवर्धन’ वर्षभराचे वेळापत्रक जानेवारी महिन्यातच संस्थेच्या सभासदांकडे पाठवले जाते. हे सगळे कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच व्हायला हवेत, यासाठी ‘कृ. गो.’ अथक प्रयत्न करत. के वळ कार्यक्रम करून व्यासपीठ निर्माण करण्याबरोबरच संगीताबद्दल विचारमंथन व्हावे, या कल्पनेलाही त्यांनी मूर्त स्वरूप दिले. ‘मुक्त संगीत संवाद’ या नावाने गेली अनेक दशके मान्यवर कलावंतांशी वैचारिक चर्चा या संस्थेमार्फत आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमाचे दृश्य फलित म्हणून संस्थेने याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला. देशभरातील सगळ्या मान्यवर कलावंतांशी झालेला हा संवाद अधिक रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे हिंदी आणि इंग्रजी भाषांतरही संस्थेने प्रकाशित के ले. अशाच स्वरूपाचे काम करणाऱ्या अन्य संस्थांनाही शक्य ती सर्व मदत करण्यात धर्माधिकारी यांचा पुढाकार असे. त्यामुळेच महाराष्ट्रातील नव्या कलावंतांना त्यांचा मोठा आधार वाटत असे. अतिशय मिश्किल स्वभावाचे धर्माधिकारी यांनी कलावंत म्हणून नव्हे, तर संयोजक म्हणून संगीत क्षेत्राला दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, हे विसरता कामा नये. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.