आज मोबाइलमध्ये कॅमेरा आल्यामुळे छायाचित्रे काढणे फार सोपे झाले असले, तरी एकाच उपकरणात सर्व सुविधा देताना कुठे तरी गुणवत्तेवर अन्याय होत असतो. त्यामुळे दर्दी लोक अजूनही छायाचित्रणासाठी पारंपरिक कॅमेराच वापरतात. पूर्वीच्या काळात ‘वागेश्वरी’ नावाने एक वेगळाच कॅमेरा जागतिक पातळीवर निकॉन व कॅननप्रमाणेच गाजला होता. त्याची संकल्पना मूळ अलापुझाचे के. करुणाकरन यांची. त्यांच्या कॅमेऱ्याने अनेकांना आजही स्मरणरंजनात रमण्याचा मोह होतो, पण आता या कॅमेऱ्याचे जनक असलेले करुणाकरन ऊर्फ थंकप्पन काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
एके काळी विचित्र पण अर्थपूर्ण नाव असलेला वागेश्वरी कॅमेरा जगात जास्त विकला जात होता. लाकडी खोक्याच्या स्वरूपातील हा कॅमेरा वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी तयार केला. अलापुझातील मुलाकल येथे कॅमेरा निर्मितीचा कारखाना त्यांनी सुरू केला. ‘वीणा वागेश्वरी’ असे या कॅमेऱ्याचे पूर्ण नाव, तो अतिशय चांगली छायाचित्रे काढण्यास उपयुक्त होता.
कुठली आर्थिक साधने नसताना करुणाकरन यांनी कॅमेरा तयार केला, त्याचे श्रेय त्यांना फारसे कुणी दिले नव्हते. त्यांचे वडील कुंजू भागवतर हे संगीतकार होते, ते वाद्ये दुरुस्तही करीत असत. वीणा, हार्मोनियम, व्हायोलिन ही वाद्ये त्यांच्या घरात नेहमीच असत. १९४२च्या सुमारास करुणाकरन सोळा वर्षांचे असताना अलापुझा येथील स्टुडिओचे मालक पद्मनाभन नायर हे एक परदेशी कॅमेरा दुरुस्तीसाठी त्यांच्या वडिलांकडे घेऊन आले. त्यांनी तो दुरुस्त करून दिला नंतर त्यांनी भागवतर यांना कॅमेरा निर्मितीसाठी गळ घातली. पण ते आव्हान त्यांनी नव्हे तर त्यांचा मुलगा करुणाकरन याने स्वीकारले. त्यांनी हा कॅमेरा तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाची सर्व पुस्तके, मासिके वाचून काढली. मद्रास व मुंबई येथे जाऊन कॅमेरा निर्मितीची साधने विकत आणली. नंतर कागदाचा वापर करून जोडता येणारा कॅमेरा तयार केला, त्यातूनच वागेश्वरी कॅमेऱ्याचा जन्म झाला. या कॅमेऱ्याला सागवानी लाकडाची चौकट, पितळी क्लिप होत्या. जर्मनीहून आयात केलेली भिंगे त्यात वापरली होती. कॅमेऱ्याची किंमत अवघी अडीचशे रुपये. महिन्याला १०० कॅमेऱ्यांचे उत्पादन ते करीत. कॅमेऱ्याचे आठ प्रकार त्यांनी बनवले. ग्रुप फोटो, पासपोर्ट फोटो त्याच्या मदतीने काढता येत असत. चार दशके वागेश्वरी कॅमेऱ्याने बाजारपेठेवर राज्य केले. न्यायवैद्यक खात्यातही त्या कॅमेऱ्याचा वापर केला जात होता. अल्ट्रासाऊंड स्कॅनर इमेजरी कॉपियरची निर्मितीही त्यांनी केली होती. ऐंशीच्या दशकात वागेश्वरी कॅमेरा आधुनिक कॅमेऱ्यांमुळे मागे पडला पण तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही.
जुने फोटो अल्बम पाहताना जुन्या पिढीला अजूनही वागेश्वरी कॅमेरा आठवतो. कॅमेऱ्यामुळे अनेकांवर प्रसिद्धीचा झोत पाडण्याचे काम अप्रत्यक्षपणे करणारे करुणाकरन स्वत: मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिले.