19 September 2020

News Flash

के. एस. बाजपेई

भारतीय परराष्ट्र सेवेत १९५२ मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुढे अमेरिका, चीन तसेच पाकिस्तानात भारताचे राजदूत म्हणून काम केले

के. एस. बाजपेई

आडनाव ‘बाजपेई’ (वाजपेयी नव्हे) लावणारे, जयपूरच्या एकाच कुटुंबातील ते चौघे- वडील गिरिजाशंकर आणि तिन्ही मुलगे : उमाशंकर, कात्यायनीशंकर आणि दुर्गाशंकर- सरकारी सेवेत उच्चपदांवर. त्यापैकी मधले- ‘केएस’ म्हणून ओळखले जाणारे कात्यायनीशंकर यांनी राजनैतिक सेवेत उच्चपदे भूषविण्याचा वडिलांचा वारसा स्वकर्तृत्वावर चालविला. हे वाचताना कुणाला ‘घराणेशाही’ आठवेल, पण ‘‘उत्तम, उच्चशिक्षित माणसे (एलीट) आणि सरंजामी धाटणीचा, अन्य कुणाला पुढे येऊ न देणारा ‘एलीटिझम’ यांत फरक करायला हवा’’ याची आठवण खुद्द केएस देत. हे दिलखुलास आणि बहुरंगी व्यक्तिमत्त्व ३० ऑगस्ट रोजी लोपले. मृत्युसमयी के. एस. बाजपेई यांचे वय ९२ होते. भारतीय परराष्ट्र सेवेत १९५२ मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुढे अमेरिका, चीन तसेच पाकिस्तानात भारताचे राजदूत म्हणून काम केले. ‘‘पाकिस्तानातही मी राजदूतच होतो- उच्चायुक्त नव्हतो; कारण त्या काही वर्षांत पाकिस्तानच राष्ट्रकुलातून (कॉमनवेल्थ) बाहेर पडला होता’’ याची आठवण ते आवर्जून, मिश्कीलपणे देत. राष्ट्रकुल संघटनेचा भारतास काहीही उपयोग होत नाही, पण असलेली मैत्री कधी तोडायची नसते, यासारखे सत्यही बाजपेईंच्या मुखातून अशा काही शैलीने ऐकू येई की, ऐकणाऱ्याला तो फटकळपणा वा स्पष्टोक्तीही वाटू नये. सहज बोलल्यासारखेच ते नेहमी वागत. पण तसे वागताना समोरच्याचा प्रतिसाद आपल्या हिताचा- राष्ट्रहिताचा- असेल की नाही, याचे पक्के भान बाळगत. ‘संवाद ठेवलाच पाहिजे. संवादाला पर्याय नाहीच’ हे अभिजात राजनैतिक सूत्र त्यांच्या वागण्यात दिसे.

ताश्कंदमध्ये १९६५ साली लालबहादूर शास्त्री गेले तेव्हा बाजपेई पाकिस्तानात राजनैतिक अधिकारी होते. पुढे राजीव गांधी यांची अत्यंत महत्त्वाची अमेरिका-भेट (१९८५) बाजपेई हे भारताचे अमेरिकेतील राजदूत असताना घडून आली. या भेटीपासून, उभय देशांतील इंदिराकालीन तणाव निवळला! १९८६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर कॅलिफोर्निया, बर्कली व ब्रॅन्डीस विद्यापीठांतील अध्यापक या नात्याने ते १९९३ पर्यंत तेथे राहिले. १९९४ मध्ये भारतात परतून त्यांनी ‘दिल्ली पॉलिसी ग्रुप’ या राजनैतिक ‘थिंक टँक’ची स्थापना केली आणि बिगरसरकारी- ‘ट्रॅक टू’ राजनयात त्यांनी योगदान दिले. याच काळात २००२ मध्ये, स्टॅन्फर्ड विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अ‍ॅण्ड कोऑपरेशन’चे ते अभ्यागत फेलो होते. भारत सरकारने २००८ पासून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे प्रमुखपद दिले, ते त्यांनी २०१० पर्यंत सांभाळले. अशा दीर्घ कारकीर्दीचा वेध घेणारे त्यांचे आत्मचरित्र मात्र निधनामुळे अपूर्ण राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:01 am

Web Title: k s bajpayee profile abn 97
Next Stories
1 डॉ. नोएल रोझ
2 म. अ. मेहेंदळे
3 गोपालस्वामी कस्तुरीरंगन
Just Now!
X