14 October 2019

News Flash

के. शिवा रेड्डी

हैदराबादमधील विवेक वर्धिनी कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचे अध्यापनही त्यांनी केले.

कविता हा मानवी प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार असतो. पण काळाच्या प्रवाहातही ती टिकून राहते. असेच दर्जेदार काव्यलेखन करणारे एक कवी म्हणजे के. शिवा रेड्डी. तेलुगू भाषेतील प्रभावी  समकालीन कवी ही त्यांची ओळख. त्यांना नुकताच बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सम्मान’ जाहीर झाला आहे.

जेव्हा कवी कविता लिहून संपवतो तेव्हा ती त्याची राहत नाही तर वाचकांची होते. वाचकाला त्यातील गुंतागुंतीचे पदर उलगडत वेगळ्याच भावना गवसतात असे रेड्डी यांचे मत आहे. वाचक कविता आत्मसात करताना त्यातील भावनिक कडय़ा उलगडत जातो, असा कवितेचा नंतरचा प्रवासही ते मांडतात. रेड्डी यांना पूर्वी अगदी कमी वयात म्हणजे ४५ व्या वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या ‘मोहना.. ओ मोहना’ या काव्यसंग्रहाला आतापर्यंत अनेक सन्मान मिळाले आहेत. तेलुगू कवितेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बिनीच्या कवींपैकी ते एक. आंध्रातील गुंटूर जिल्ह्य़ात १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी त्यांचे मातृछत्र हरपले. सातवीत असल्यापासून कवितेशी त्यांची दोस्ती जमली. रेड्डी हे मूळ तेनाली गावचे पण तेथे त्यांच्या काव्यलेखनास पुरेसा वाव मिळणे शक्य नसल्याने ते हैदराबादला आले. हैदराबादमध्ये त्या काळात काव्यवाचनाचे कार्यक्रम होत असत. त्यातील सहभागातून त्यांचे नाव होत गेले. संस्कृतीच्या नावाने कुणीही वर्चस्व गाजवू नये कारण ती दडपशाहीच ठरते असे त्यांचे म्हणणे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमुळे ते डाव्या विचारसरणीकडे ओढले गेले. नंतर हैदराबादच्या विद्यार्थी चळवळीतही त्यांनी काम केले. अजूनही ते डाव्या चळवळीचे समर्थन करतात. कवी असला तरी त्याला राजकीय दृष्टी असली पाहिजे. महाकाव्यांसह सर्व कविता वाचताना समाजाचा पुनशरेध घेता आला पाहिजे, अशी त्यांची नवकवींकडून अपेक्षा आहे.

हैदराबादमधील विवेक वर्धिनी कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचे अध्यापनही त्यांनी केले. त्यांच्या कवितांचे २३ खंड प्रसिद्ध आहेत. कवितेवरील त्यांचे समीक्षालेखनही तेलुगूमध्ये महत्त्वाचे मानले जाते. कविता हे अन्यायाविरोधात लढण्याचे एक साधन आहे असा त्यांचा विश्वास आहे. समता व मानवता या तत्त्वांसाठी त्यांनी संघर्षही केला. २०१६ मध्ये ‘पक्काकि ओटिगिलीटे’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांवर ग्रामीण जीवनानुभवाचा व निसर्गाचा पगडा आहे. तीन दशके त्यांनी आपल्या काव्यातून अनेक सामाजिक विषय हाताळले. त्यांच्या कवितांचा पैस हा फार मोठा आहे- जीवनाच्या प्रत्येक अंगाला त्यांची कविता स्पर्श करते त्यामुळे काळाच्या ओघातही टिकण्याची क्षमता तिच्यात आहे.

First Published on May 10, 2019 1:14 am

Web Title: k siva reddy profile