15 December 2019

News Flash

के सुभाष

१९८७ मध्ये कमल हासनचा ‘नायकन’ हा चित्रपट खूपच गाजला.

१९८७ मध्ये कमल हासनचा ‘नायकन’ हा चित्रपट खूपच गाजला. अगदी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये त्याची चर्चा झाली. पुढच्याच वर्षी, १९८८ मध्ये फिरोज खानने त्यावर आधारित ‘दयावान’ हा चित्रपट हिंदीत आणला. तोही तिकीटबारीवर यशस्वी ठरला. मुंबईतील एके काळचा डॉन वरदराजन याच्या आयुष्यावर तो बेतलेला होता हेही त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. मूळ तामिळ चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एका तरुणाला सहदिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत आणले. के सुभाष हे त्याचे नाव!

शंकर कृष्णन असे यांचे मूळ नाव होते  त्यांचे वडील आर कृष्णनही तामिळ सिनेसृष्टीत होते. विख्यात अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या ‘परशक्ती’ या चित्रपटाचे ते सहदिग्दर्शक होते. त्यांच्याकडेच सुभाष यांनी दिग्दर्शनाचे प्राथमिक धडे गिरवले. ‘नायकन’नंतर ‘कलियुगम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला तामिळ चित्रपट. प्रभूसारखा स्टार असूनही तो काही फारसा चालला नाही. त्यानंतर आला विजयकांतची मुख्य भूमिका असलेला ‘क्षत्रिय’. तुफान हाणामारी आणि रक्तरंजित प्रसंग असलेला हा चित्रपट शौकिनांनी डोक्यावर घेतला आणि के सुभाष यांचे नाव सर्वतोमुखी झाले. यानंतर ब्रह्मा, पवित्र, अभिमन्यू, निनाईविरुक्कुम, अयूल कैदीसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. काही चित्रपटांची निर्मितीही केली.

तामिळ चित्रपटसृष्टीत चांगले नाव झाल्यानंतर मणिरत्नम, प्रभुदेवा यांच्या सहकार्यामुळे ते बॉलीवूडमध्ये आले. गोविंदाचा ‘ब्रह्म’ (१९९४) आणि अजय देवगण, अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इन्सान’ (२००५) हे दोन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले, पण ते आपटले. तेथून मग हिंदी चित्रपटांची पटकथा ते लिहू लागले. ‘सण्डे’, ‘दिलवाले’ आणि ‘हाऊसफुल ३’ या चित्रपटांबरोबरच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनमुळे गाजलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची कथाही सुभाष यांचीच होती. राजकुमार संतोषी यांच्या काही चित्रपटांचे ते सहदिग्दर्शक होते. अनेक कथांचा कच्चा आराखडा त्यांच्याकडे होता. त्यातील काही कथांसंबंधी त्यांनी  मित्रांसमवेत चर्चाही केली, पण मित्र म्हणवणाऱ्यांनी त्याच कथेचे मुख्य सूत्र उचलून त्यावर चित्रपटही बनवले, पण सुभाष यांना त्याचे श्रेय दिले नाही. याबद्दल त्यांना कोणी छेडले तर तहानलेला आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याकडील बादली भरून पाणी नेले तर काही बिघडत नाही, असे ते म्हणत. काम करण्याची प्रचंड ऊर्जा त्यांच्यात होती. पण मूत्रपिंडाचा विकार झाल्याने त्याचा परिणाम कामावर झाला. प्रभुदेवा यांच्या एका चित्रपटाची जुळवाजुळव चालू असतानाच गुरुवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सिनेसृष्टीत सुभाष यांच्यासारखे लोक आज अभावानेच आढळतात, ही अभिनेत्री राधिका हिने व्यक्त केलेली भावना त्यांचे मोठेपण अधोरेखित करणारी आहे.

First Published on November 25, 2016 2:57 am

Web Title: k subhash
Just Now!
X