News Flash

के. सूर्यनारायण राव

गोळवलकर गुरुजींच्या काळात संघाचा दक्षिण भारतात ज्यांनी विस्तार केला त्यात राव यांचे योगदान फार मोठे होते

के. सूर्यनारायण राव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण भारतातील अध्वर्यू के. सूर्यनारायण राव यांचे नुकतेच झालेले निधन ही संघाच्या सेवाप्रकल्पांसाठी मोठी हानी आहे. गोळवलकर गुरुजींच्या काळात संघाचा दक्षिण भारतात ज्यांनी विस्तार केला त्यात राव यांचे  योगदान फार मोठे होते. संघवर्तुळात ‘सुरुजी’ या टोपणनावाने परिचित असलेले राव मूळचे म्हैसूरचे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते संघाकडे आकृष्ट झाले व पदवी मिळवल्यानंतर संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संपूर्ण कर्नाटकात संघविस्तारासाठी झटणाऱ्या सुरुजींवर संघाने दक्षिणेत विश्व हिंदू परिषदेचे पहिले संमेलन घेण्याची जबाबदारी दिली. १९६९ मध्ये उडपीला झालेले हे संमेलन यशस्वी तर झालेच, पण एका ठरावासाठी संघवर्तुळात दीर्घकाळ स्मरणात राहिले. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेच्या विरोधात या संमेलनात एकमताने ठराव पारित करण्यात आला. त्याचे श्रेय सुरुजींकडे जाते.

नंतर संघाने त्यांना शेजारच्या तामिळनाडूची जबाबदारी सोपवली. तब्बल १४ वर्षे ते प्रांत प्रचारक म्हणून या राज्यात सक्रिय राहिले. त्यांचे काम बघून दक्षिणेकडील चारही राज्यांचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. १९९० मध्ये सुरुजींना  संघाच्या सेवाप्रकल्पाचे काम देण्यात आले. या प्रकल्पांना खरा आकार दिला तो राव यांनीच. जे लोक संघात येत नाहीत, त्यांना सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून संघकार्याशी जोडण्याचे मोठे काम सुरुजींनी नंतरच्या दहा वर्षांत केले. जंगलात राहणाऱ्या तरुणांपासून ते झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना त्यांनी या सेवाप्रकल्पांशी जोडले. केवळ देशातच नाही, तर विदेशातसुद्धा त्यांनी सेवाप्रकल्पांचा विस्तार कसा होईल, याकडे जातीने लक्ष दिले. यासाठी अनेक देशांचे दौरे केले. याच काळात ते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळावर आले.

संघ विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो, पण आरोग्यासाठी काहीही करीत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी कार्यकारी मंडळासमोर आरोग्य भारतीची संकल्पना मांडली. नंतर आरोग्य भारतीच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करणे, वैद्यक क्षेत्रातील मान्यवरांना या प्रकल्पाशी जोडणे, दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सुरुजी अखेपर्यंत करीत राहिले. प्रख्यात स्तंभलेखक एस. गुरुमूर्ती यांच्यावर त्यांचा भारी जीव. गुरुमूर्तीनी सुरुजींना गुरूचे स्थान दिले आहे. माझ्यातील उणिवांकडे दुर्लक्ष करून केवळ सकारात्मक बाजूंवर लक्ष केंद्रित करणारे सुरुजी महान होते, असे गुरुमूर्ती नेहमी सांगतात. अखेरच्या काळात चेन्नईत राहून संघविस्ताराचा ध्यास कायम ठेवणाऱ्या रावांच्या जाण्यामुळे संघाचा दक्षिणेतील आधारवडच हरवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:59 am

Web Title: k surya rao
Next Stories
1 डॉ. डेन्टन कुली
2 उषा  मा. देशमुख
3 लेफ्ट. जन. एस के सिन्हा
Just Now!
X