28 January 2020

News Flash

कमाल बोलाता

पॅलेस्टाइनच्या कलेचा असाच शोध चित्रकार कमाल बोलाता यांनी घेतला.

कमाल बोलाता

दृश्यकलेला भाषा नसते, प्रांतही नसतो, हे समज मान्यच.. पण दृश्यकलेचा इतिहास मात्र प्रत्येक प्रांताला आपापला असतो आणि त्या इतिहासातून प्रेरणा घेऊन, त्याच्याशी सांस्कृतिक नाते जोडत त्या-त्या प्रांतात घडणारी कलासुद्धा निरनिराळीच असते. आधुनिक कलेने गेल्या फारतर दीडशे वर्षांत हे सारे कलाप्रवाह सामावून घेतले खरे, पण त्यांतले उपप्रवाह, त्यांमागची सांस्कृतिक ओळख यांचा शोध अव्याहत सुरू असतो. त्यामुळेच मराठाकालीन चित्रशैली राजपूत चित्रशैलींपेक्षा वेगळी कशी, याचा शोध आजही कुणी घेत असते! पॅलेस्टाइनच्या कलेचा असाच शोध चित्रकार कमाल बोलाता यांनी घेतला. ‘पॅलेस्टिनी आर्ट’ या ३६५ पानी ग्रंथावर लेखक म्हणून पहिले नाव बोलाता यांचे, आणि दुसरे- कलेचे जगप्रसिद्ध इतिहासकार जॉन बर्जर यांचे आहे. हे कमाल बोलाता, गेल्या मंगळवारी बर्लिन मुक्कामी कालवश झाले. तमाम पाश्चिमात्त्य कला-नियतकालिकांनी या चित्रकार-इतिहासकाराला आदरांजली वाहिली. बोलाता यांचे कर्तृत्व हे एका संदर्भग्रंथाच्या निर्मितीपुरते सीमित नव्हते. चित्रकार म्हणून त्यांनी पॅलेस्टिनी कलाप्रवाहाचा शोध आधीच घेतला होता. जेरुसलेम हे शहरच मुळात संस्कृतीच्या तिठय़ावरले.. अनेक कलाशैलींची तेथे सरमिसळ. मात्र तेथेच, बायझंटाइन कला आणि इस्लामी कला यांना सांधणारी आकारसूत्रे कमाल यांना सापडली! जेरुसलेमध्ये १९४२ साली जन्मलेल्या बोलाता यांना इस्रायलच्या निर्मितीनंतर सततच्या हिंसाचारामुळे बालपणीच अन्य अनेक शहरांत राहावे लागले, पण कलेची आवड त्यांनी जपली. त्यामुळेच ते कलाशिक्षणासाठी युरोपात गेले, अमेरिकी शिष्यवृत्ती मिळवून वॉशिंग्टन शहरात शिकले. १९५० नंतर जगभरचे कलावंत अमूर्तकलेच्या प्रेरणांनी भारावले होते, त्यांपैकी पहिल्या काही पॅलेस्टिनी चित्रकारांमध्ये कमाल बोलाता यांचा समावेश होतो.  त्यांची चित्रे ही अरबी लिपीच्या वळणांतूनच जणू साकारलेली, पण सुलेखनकलेपेक्षा (कॅलिग्राफी) निराळी- वाचता येण्याजोगा कोणताही मजकूर नसलेली- असत. पुढे ते याहीपलीकडे गेले आणि पूर्णत: अमूर्त चित्रांकडे वळले. तरुणपणी ‘रोजचे जगणे’ हाच आवडता चित्रविषय असणारे कमाल, दरवर्षी निरनिराळय़ा देशांत, विविध शहरांत जगत होते. परागंदा व्हावे लागूनही ‘आपला’ कलाप्रवाह ओळखणाऱ्या या कलावंताने, अनेक पॅलेस्टिनी, अरब सांस्कृतिक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली होती.

First Published on August 13, 2019 12:03 am

Web Title: kamal boullata palestinian art abn 97
Next Stories
1 जे. ओम प्रकाश
2 ख्रिस्तियन गिलमिनॉल्ट
3 अनंत सेटलवाड
Just Now!
X