12 November 2019

News Flash

कमलाकर नाडकर्णी

नाडकर्णीनी वृत्तपत्रीय समीक्षेला प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त करून दिला.

‘वर्तमानपत्री नाटय़परीक्षणे ही खरी नाटय़समीक्षा नव्हे..’ हे मत आहे गेली तब्बल ५५-६० वर्षे विविध नियतकालिके व वर्तमानपत्रांतून नाटकाची परखड समीक्षा करणाऱ्या ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे! अ. भा. मराठी नाटय़ परिषदेने त्यांच्या रंगभूमीवरील योगदानाकरता जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. बालनाटय़ांतून रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या आणि पुढे राज्य नाटय़स्पर्धा आणि मुख्य धारा रंगभूमीवर नट व अनुवादक म्हणून सक्रीय योगदान देणाऱ्या नाडकर्णीनी नंतर आपला मोहरा नाटय़समीक्षेकडे वळवला. रंगभूमीचा प्रत्यक्षानुभव, नाटकाची प्रचंड पॅशन आणि अभ्यासू वृत्ती यांच्या समन्वयातून त्यांच्यातला समीक्षक घडत गेला. आज वयाची ऐंशी पार करूनही त्यांचे नाटय़वेड तसूभरही कमी झालेले नाही. हल्ली प्रकृती साथ देत नसतानासुद्धा त्यांनी नाटके पाहणे अजून सोडलेले नाही.

नाडकर्णीनी वृत्तपत्रीय समीक्षेला प्रतिष्ठा आणि दर्जा प्राप्त करून दिला. वृत्तपत्रीय कामाच्या धबडग्यातही नाटकाचे परीक्षण लिहिताना संहितेचे वाचन, नाटय़विषयाशी संबंधित अधिकची माहिती मिळवणे, त्याबद्दलचे चिंतन-मनन या गोष्टी नाडकर्णी आवर्जून करीत. यातून त्यांच्या समीक्षेला खोली प्राप्त झाली. गांभीर्यपूर्वक वृत्तपत्रीय समीक्षेचा त्यांचा हा वारसा पुढच्या काळात प्रशांत दळवी, जयंत पवार यांनी समर्थपणे पुढे नेला. घणाघाती टीका आणि तोंड फाटेस्तो स्तुती अशी नाडकर्णीच्या समीक्षेची दोन रूपे आहेत. प्रायोगिक नाटकांकडे मात्र ते काहीसे सहानुभूतीने पाहत. त्यांच्या तलवारबाज समीक्षेपायी त्यांच्यावर प्रसंगी हेत्वारोपही केले गेले. एकदा तर एका रंगकर्मीने आपल्यावरील टीकेने संतप्त होऊन नाडकर्णी यांच्यावर आपण एक नाटक मंचित करणार असल्याची उपरोधिक जाहिरात वर्तमानपत्रांतून दिली होती. ‘जाणता राजा’ या शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमावर ‘द ग्रेट बाबासाहेब सर्कस’ या मथळ्याखाली त्यांनी घणघोर झोड उठवली होती. लेखणी आणि वाणी दोन्ही वश असलेले नाडकर्णी शनिवार-रविवारी बाहेरगावी जाऊन तिथे होणारे नाटय़‘प्रयोग’ आवर्जून पाहत. रंगभूमीवरील चर्चा, परिसंवादांतून हजेरी लावीत. काही काळ त्यांनी चित्रपट समीक्षाही केली. त्यांच्या लेखणीने अनेकजण दुखावले असल्याने नाटय़कर्तृत्व असूनही नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मात्र त्यांच्या नावाला कायम विरोध होत राहिला. या पाश्र्वभूमीवर नाटय़  परिषदेने त्यांच्या नाटय़क्षेत्रातील योगदानाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करणे हे तसे सुखदाश्चर्यच म्हणावे लागेल. खरे तर हा त्यांच्यातल्या नाटकाच्या ‘पॅशन’चाच गौरव आहे.  त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

First Published on June 14, 2019 2:08 am

Web Title: kamlakar nadkarni