स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याचा पहिलाच प्रयत्न आणि या पहिल्याच प्रयत्नाला चार राष्ट्रीय पुरस्कारांनी मिळालेली दाद यामुळे ‘कळत नकळत’चा दिग्दर्शक हीच कांचन नायक यांची खरी ओळख ठरली. मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवू पाहणाऱ्या, सिनेमाच्या वेडाने झपाटलेल्या कांचन नायक यांची कारकीर्द या चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने आकाराला यायला हवी होती. मात्र दुर्दैवाने त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच चित्रपटांचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन करता आले. मालिका व चित्रपट क्षेत्रात उत्तम साहाय्यक दिग्दर्शक म्हणून ते दीर्घकाळ (१९७२ पासून) कार्यरत होते.

मराठी चित्रपटांमध्ये आपल्या दिग्दर्शनाची वेगवेगळी शैली जपणारे राजदत्त आणि जब्बार पटेल या दोन प्रतिभावान दिग्दर्शकांकडे त्यांनी  काम केले. या दोघांचाही कांचन नायक यांच्यावर कमालीचा विश्वास होता. त्यांच्या शैलीचा प्रभाव कांचन नायक यांच्याही सिनेमावर पडला नसता तरच नवल! त्यांनी जे चित्रपट केले त्यांचेही विषय सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित होते. ‘कळत नकळत’ हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आणखी दोन चित्रपटांची तयारी सुरू केली होती. एका चित्रपटात अजिंक्य देव आणि वर्षां उसगावकर या दोघांची निवडही करण्यात आली होती, मात्र काही कारणांमुळे हे दोन्ही चित्रपट प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. आणि म्हणूनच कदाचित दिग्दर्शक म्हणून भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यानंतर खूप वर्षांनी २००१ मध्ये त्यांनी ‘राजू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामाचा अनुभव घेतल्यानंतर स्वत:ची वेगळी वहिवाट शोधण्याचे धाडस त्यांच्यात होते. पण त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ, थंडावलेली चित्रपट निर्मिती यांचा परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर झाला.  तरीही ते तिथेच थांबले नाहीत, त्या काळात त्यांनी अनेक लघुपट, शासकीय पातळीवरील माहितीपटांचे लेखन-दिग्दर्शन केले. मालिकांचे युग आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तिथे वळवला. ‘दूरदर्शन’वरील ‘आव्हान’ या मालिकेचे पटकथा लेखन-दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यानंतर हिंदीत ‘प्रारंभ’ ही मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केली. आणि नंतरच्या काळात गाजलेल्या ‘क्राइम डायरी’च्याही दीडशेहून अधिक भागांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

सिनेमाची उत्तम जाण, साहित्याचा अभ्यास, चौफेर वाचन असणाऱ्या या बहुआयामी हरहुन्नरी लेखक-दिग्दर्शकाने मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या कामातून आपली ओळख निर्माण केली, म्हणूनच ते वेगळे ठरले.