15 December 2019

News Flash

कपिलावई लिंगमूर्ती

तेलुगू साहित्यात फार मोठी कामगिरी केलेले साहित्यिक  तर ते होतेच, शिवाय कवीही होते.

कपिलावई लिंगमूर्ती

इतिहासातही रस असलेले साहित्यिक कमी असतात, पण तेलंगणातील कपिलावई लिंगमूर्ती हे साहित्यिक तर होतेच, पण त्यांना इतिहासाचेही प्रचंड वेड होते यामुळेच त्यांच्या हातून लोकप्रियच नव्हे तर सकस साहित्याची निर्मिती होऊ शकली. तेलुगू साहित्यात फार मोठी कामगिरी केलेले साहित्यिक  तर ते होतेच, शिवाय कवीही होते.

त्यांचा जन्म ३१ मार्च १९२८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव के. व्यंकटाचलम होते. वडील वारल्याने ते लहान असतानाच मामाकडे वास्तव्यास गेले. तेथे त्यांना साहित्याची गोडी लागली ती अखेपर्यंत कायम होती. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी एम. ए.ची पदवी घेतली. त्यात तेलुगू साहित्य हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यातूनच त्यांनी मोठय़ा प्रमाणात साहित्याचे वाचन करून आंध्र व तेलंगणाच्या इतिहासाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये या इतिहासाचे संदर्भ जागोजागी दिसून येतात. कविता कलानिधी, रीसर्च पंचना, कवी केसरी, वेदांत विशारद, गुरू शिरोमणी, साहित्य स्वर्ण सौरभ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. अनेक संस्थांमध्ये ते व्याख्याते म्हणून काम करीत होते. सुरुवातीला नगरकुर्नुल येथील शाळेत ते तेलुगूचे शिक्षक होते. नंतर पालेम येथे श्री व्यंकटेश्वरा ओरिएंटल कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. तेलुगू साहित्यात १०० पुस्तकांची भर घालून त्यांनी १९८३ मध्येच लेखनातून निवृत्ती पत्करली होती, तरी श्रीशैलममधील उमा माहेश्वरम या पवित्र ठिकाणाचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. २०१४ मध्ये त्यांना पोट्टी श्रीरामुलू विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या साहित्यावर आतापर्यंत सहा संशोधकांनी पीएच.डी. केली आहे. त्यांची ओळख केवळ साहित्यिक अशी नव्हती तर कवी, इतिहासकार, शिक्षक, ज्योतिषी म्हणूनही त्यांनी नाव कमावले. सतकाम, द्विपद नाटकम, विविध ठिकाणांच्या दंतकथा, बालसाहित्य यात त्यांनी मोठे काम केले. चिता पडी, चित्र बंधमु यांसारख्या साहित्यतंत्रांचा वापर त्यांनी केला. त्यांची २५ पुस्तके आजही अप्रकाशित आहेत. आर्य सताकम, श्रीमथ प्रताप गिरी खंडम, सोमेश्वर क्षेत्र माहात्म्यम, पडय़ा कथा पारिमलामु, पालामूर जिला देलालयालु, सलग्राम सास्त्रम, श्री रुद्रध्यायामु यांसारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. लिंगमूर्ती यांच्या निधनाने तेलुगू भाषेचा तज्ज्ञ, इतिहासकार, पुराणकथा व ठिकाणांचा भाष्यकार या नात्याने एक चालताबोलता ज्ञानकोशच लुप्त झाला आहे.

First Published on November 8, 2018 1:35 am

Web Title: kapilavai lingamurthy profile
Just Now!
X