संस्कृती ही संग्रहालयात ठेवण्याची किंवा मुद्दाम जपण्याची गोष्ट नसून जी बदलांच्या रेटय़ातही जपली जाते तीच तर संस्कृती, असा एक विचार मांडला जातो. तो ठीकच, पण तरीही संग्रहालयांत ठेवलेल्या वस्तू महत्त्वाच्या ठरतात, कारण त्या आपल्याला आपल्या संस्कृतीतले नेमके काय आपण आज ‘आपोआप’ जपतो आहोत, हे नेमके सांगतात. वर्तमानकाळापेक्षा भूतकाळात रमणे वाईटच; पण तो गतकाळ कोणत्या मानवी गुणांमुळे चांगला होता, हे त्या वस्तू सांगू शकतात. पुरातन वा इतिहासकालीन वस्तूंची ही भाषा अभ्यासकांना समजते, ती मग आपल्यापर्यंत आपापल्या भाषांत पोहोचते. करुणा गोस्वामी या अशा वस्तूंची भाषा नेमकी जाणणाऱ्या अभ्यासक होत्या. त्यांचे निधन २५ ऑक्टोबर रोजी, त्यांची कर्मभूमी ठरलेल्या चंडीगड शहरातच झाले.

‘पहाडी लघुचित्रे आणि पंजाबच्या पर्वतीय भागातील वैष्णवपंथ’ हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता (‘पंजाबचा पर्वतीय प्रदेश’ म्हणजे शिवालिक आणि आजचा हिमाचल प्रदेश). तो धागा त्यांनी पुढे कुलू खोऱ्यात आजही साजरा होणाऱ्या दसरा समारंभाशी जोडला. या दोन परंपरा भिन्नच, पण एकाच प्रदेशातील लोकांनी त्या कशा स्वीकारल्या आणि त्यापैकी कोणती टिकवली व का, याची उत्तरे करुणा गोस्वामी यांनी केलेल्या अभ्यासातून मिळाली. विख्यात कलेतिहासकार व पुरावस्तूविद् बी. एन. गोस्वामी हे त्यांचे पती. दोघे चंडीगडच्या ‘पंजाब विद्यापीठा’त अध्यापन करीत. २०-२२ वर्षांपूर्वी विद्यापीठातून त्यांनी निवृत्ती घेतली. सिमला येथील प्रगत अध्ययन संस्थेच्या (इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडी) फेलो म्हणून त्यांनी यानंतरही काम केले. त्यांच्या सुमारे २५ पुस्तकांपैकी दोन, सिमल्याच्या या संस्थेनेच प्रकाशित केली आहेत. ‘दिलीपरंजनी’ या प्राचीन काव्याच्या संहितेचे इंग्रजीकरण आणि सटीक अभ्यास हे यापैकी एक महत्त्वाचे पुस्तक. हे काव्य तत्कालीन समाजाबद्दल काय सांगते, याचाही हा अभ्यास आहे.

समकालीन कलेकडे सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक कसे पाहातात, याचा नमुना म्हणजे त्यांचे ‘सेक्रेड ट्रीज अ‍ॅण्ड इंडियन लाइफ’ हे पुस्तक. छायाचित्रकार सुसान हॉक्स यांनी टिपलेल्या फोटोंसह करुणा यांचे लिखाण दिसते. पण फोटो आजचे असूनही त्यांचा संबंध कोणकोणत्या काळांशी आहे, हे करुणा सांगतात. स्वित्झर्लंडच्या झुरिक येथे राइटबर्ग म्युझियममधील दुर्गाचित्रे आणि हस्तलिखिते यांच्या आधारे लिहिलेले पुस्तक किंवा काश्मिरी चित्रकामात शतकांगणिक घडलेले बदल टिपणारे पुस्तक, ही त्यांनी अभ्यासविषयाचा शोध कसा महत्त्वाचा मानला, याची उदाहरणे ठरतात.

करुणा यांच्या निधनाने, बी. एन. गोस्वामी यांना सहचरी आणि सहलेखिकेची साथ सुटल्याचे दु:ख होणे स्वाभाविकच. पण चंडीगडमधील ‘स्पिक मॅके’सारख्या चळवळींत करुणा यांचा सहभाग असल्याने त्या शहरातील कलाप्रेमीही करुणा गोस्वामींच्या निधनवार्तेने हळहळले.