हिराबाई बडोदेकरांनी स्त्रियांसाठी गायिका म्हणून नाव कमावण्याचा मार्ग प्रशस्त, प्रतिष्ठित केल्यानंतर त्यावरून अनेकजणी पुढे आल्या. त्यातही १९५० च्या दशकात मराठीत मालती पांडे-बर्वे, माणिक दादरकर-वर्मा, किंवा गुजरातीत कौमुदी मुन्शी अशा अनेक गायिका स्थिरावण्याचे कारण स्वातंत्र्योत्तर काळात नभोवाणी आणि ‘सुगम संगीत’- भावगीते यांचा श्रोतृवर्ग वाढू लागला हेही होते. तेव्हाच्या या गायिकांना शास्त्रीय संगीताची बैठक होती, पण  सुगम संगीताच्या लयीशी जुळवून घेत त्या वाढल्या. त्यांच्या नंतर आलेल्या काहीजणी सिनेसंगीत क्षेत्रातील एकाधिकारशाहीत होरपळल्याच, पण गायिकांच्या १९५० पासूनच्या पिढीला या स्पर्धेत फार उतरावेसे वाटलेसुद्धा नव्हते, कारण सुगम संगीताच्या क्षेत्रात त्या मनापासून रमल्या. अशा पिढीच्या प्रतिनिधी कौमुदी मुन्शी यांचे बुधवारी वयाच्या ९२व्या वर्षी, कोविडमुळे निधन झाले.

त्यांचा जन्म वाराणसीचा. आईवडिलांची घराणी सुशिक्षित, प्रतिष्ठित वगैरे. कौमुदी हे सहावे अपत्य. तिथल्या बनारस हिन्दू विश्वविद्यालयातून त्यांनी बीएची पदवी घेतली, पालकांनी गायनाच्या छंदाला प्रोत्साहन दिल्यामुळे ठुमरी-गुरू सिद्धेश्वरीदेवी यांच्याकडे पाच वर्षे शिकल्या. गझलचीही तालीम त्यांनी ताज अहमद खान यांच्याकडे घेतली. तोवर त्यांचे तीन्ही बंधू मुंबई स्थिरावले होते. साधारण विशी-पंचविशीदरम्यान त्या मुंबईत आल्या आणि भाऊ-वहिन्यांसह राहू लागल्या. येण्याचे कारण- संगीतात करिअर करण्याची, मामा व गुजराती साहित्यिक आर. व्ही. देसाई यांनी जागविलेली ईर्षां. ‘रेडिओ सिंगर’ होण्याचे प्रयत्न वृंदगानापर्यंतच थांबले, पण नंतर आवाजाची ओळख अनेकांना झाली, त्यापैकी नीनू (निरंजन) मजुमदार यांनी प्रोत्साहन दिले. पुढे मजुमदार यांच्याशीच त्या विवाहबद्ध झाल्या. गुजराती गरबागीते व भजने तर त्यांनी गाजवलीच, पण गुजराती भावगीतांचा काळही घडवला. हिंदीतही गायल्या. ‘राजा और रंक’, ‘भाईसाहेब’ या हिंदी चित्रपटांतील गाणी त्यांच्या आवाजाने सजली. ‘भाई साहेब’मधील ‘नग्म्मा ऐ दिल सुना’ गाताना त्यांची हिंदी-उर्दूची तयारी दिसली, तर ‘तारो वियोग’ या उपशास्त्रीय गुजराती गीतसंग्रहातील ‘तारा जवानुं ज्यारे मने.’ ही विरहिणी गाताना त्यांनी सिद्धेश्वरीदेवींच्या सुशील ठुमरीचे रंग अभिव्यक्त केले. सुगम संगीत शिकण्याची इच्छा असलेल्यांना त्या शिकवतही. नातवंडांसाठी तर त्यांनी बालगीते लिहून, स्वत: गायली होती. प्रामुख्याने गुजरातील गीते गायल्याने, ‘गुजरात-कोकिळा’ अशीच या मुंबईकर गायिकेची ओळख उरली.