चित्रपटांच्या झगमगत्या दुनियेत कधीही प्रकाशझोतात न येताही आपल्या कर्तृत्वाने झळकणाऱ्या थोडय़ा व्यक्तींमध्ये केर्सी लॉर्ड यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. भारतीय चित्रसृष्टीचा आत्मा म्हणजे संगीत. चित्रपट बोलायला लागल्यानंतर गेल्या नऊ दशकांत या संगीताने प्रत्येक भारतीयाच्या मनातील प्रचंड जागा व्यापली आहे. प्रत्येक गीताशी प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे नाते तयार झालेले असते. कारणे अनेक असतील, पण त्या गीतातील शब्द, आवाज आणि स्वररचनेला उठाव देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत. पण खरे तर त्यांच्यामुळेच ते गीत आपल्या हृदयात जाऊन ठाण मांडून बसते. केर्सी लॉर्ड यांचे वैशिष्टय़ हे की त्यांनी अशा हजारो गीतांची झळाळी आपल्या सर्जनशीलतेने वाढवली आहे.

एक ख्यातनाम संगीत नियोजक (अ‍ॅरेंजर) म्हणून ते जेवढे कर्तृत्ववान होते, तेवढेच संगीतकार म्हणून आणि वाद्यवादक म्हणूनही. ‘रूप तेरा मस्ताना’ या ‘आराधना’तल्या गीतातील अ‍ॅकॉर्डिअन हे वाद्य त्या गाण्याची लज्जत एवढी वाढवते, की ऐकणाऱ्याच्या कानातून ते सुटूच शकत नाही. ते वाद्य वाजवले होते केर्सी लॉर्ड यांनी. चित्रपट संगीत हा प्रज्ञावंतांचा मेळा असतो. प्रत्येकाच्या सर्जनाने ते संगीत समृद्ध होत असते. संगीतकार म्हणून गीताची चाल लावणे हे एक काम असते. पण त्या गीतातील दोन कडव्यांच्या मधील वाद्यसंगीत, गायकाच्या बरोबरीने वाजणारे स्वरमेळ (काँट्रा मेलडीज) ही कामे करणारे लॉर्ड यांच्यासारखे अतिशय प्रतिभावान कलावंत चित्रपट संगीताला लाभले, म्हणूच ते विस्मृतीत जाऊ शकलेले नाही. कॅसनेट्स, इलेक्ट्रिक ऑर्गन, ऑसिलेटर यांसारख्या अनेक नवनव्या वाद्यांवर हुकूमत असणाऱ्या लॉर्ड यांनी चित्रसंगीतात त्यांचा अतिशय चपखलपणे वापर केला. गीत अधिक उठून यावे, त्यातील शब्द आणि भाव अधिक तेजस्वी व्हावेत, यासाठी त्या गीतातील वाद्यमेळावर अतिशय मेहनत करावी लागते. हे काम करणारे अनेक थोर लोक भारतीय चित्रसृष्टीत होते आणि आहेत. केर्सी हे या सगळ्यांचे गुरू. प्रत्येक गीतातील भावानुसार त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या अशा प्रतिभावंतांना कधी प्रकाशझोत मिळाला नाही, तरी त्या क्षेत्रात त्यांचे स्थान गुरुतुल्यच राहिले. स्वत: संगीतकार असल्याने लॉर्ड यांना त्यातील ग्यानबाची मेख फार पटकन कळत असे. कलावंताची अभिजात नजर असल्याने केर्सी त्या गीताचे सोने करून टाकत. आपल्या या कर्तृत्वाचा त्यांनी कधी बडेजाव केला नाही. वयाची पंचाऐंशी गाठलेल्या केर्सी लॉर्ड यांचे आयुष्य संगीतमय तर होतेच पण सतत नव्या प्रयोगांनी भारलेलेही होते. संगीताच्या क्षेत्रात आपली अशी खास चमक दाखवून मुद्रा उमटवणाऱ्या लॉर्ड यांच्या निधनाने या क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे.