News Flash

डॉ. केशव राज क्रांती

सनदशीर मार्गाने, व्यवस्थेत राहून त्यांना वेसण घालण्याचे क्रांतिकारी काम झाले.

डॉ. केशव राज क्रांती  

जागतिकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या देशात आल्यावर, ईस्ट इंडिया कंपनीची आठवण लोक काढू लागले. कृषी क्षेत्रात मोन्सॅन्टो, सिजेन्टा या कंपन्यांनी बीटी कापसाचे वाण आणले. कापसाच्या बियाणांत मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कंपन्या लूट करताहेत, असा प्रतिरोधही झाला. पण सनदशीर मार्गाने, व्यवस्थेत राहून त्यांना वेसण घालण्याचे क्रांतिकारी काम झाले. आरोप-प्रत्यारोप, आरडाओरडा न करता संशोधनाला संशोधनानेच उत्तर देऊन या कंपन्यांना ताळ्यावर आणण्याचे काम एका कृषी शास्त्रज्ञाने केले. आपण काम कशासाठी करतो हे उद्दिष्ट नक्की झाले की, अशा प्रकारचे काम पुढे जाते हे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव राज क्रांती यांनी दाखवून दिले. त्यांच्या क्रांतिकारी कामाची दखल घेतली गेल्याने आता त्यांची वॉिशग्टन येथील आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार संस्थेच्या (आयसीएसी) तांत्रिक विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. एप्रिलमध्ये ते तेथे रुजू होत आहेत. ही संस्था जगभरातील ४० देशांनी एकत्र येऊन स्थापन केली असून भारत हा तिचा सदस्य आहे.

विदर्भ, मराठवाडय़ात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यानंतर त्याला बीटी वाण जबाबदार असल्याची टीका काहींनी सुरू केली. तर डॉ. क्रांती यांनी अभ्यास सुरू करून, या वाणातील दोष हुडकून काढले. जगभरातील कापूस लागवडीचा व बियाणांचा अभ्यास केला. बीटी वाणाची प्रतीकारक्षमता कमी झाली असून गुलाबी बोंडआळीचा त्यावर प्रादुर्भाव होत असल्याचे त्यांनी संशोधनातून दाखवून दिले. यामुळेच त्या बहुराष्ट्रीय बियाणांची रॉयल्टी १८५ रुपयांवरून ४५ रुपयांवर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला.  विशेष म्हणजे कृषी विद्यापीठे बीटी बियाणांच्या क्षेत्रात संशोधन करत नव्हती. त्यांना ते करायला क्रांती यांनी भाग पाडले. देशी वाणात बीटी बियाणे विविध संस्थांच्या माध्यमातून संशोधीत केले. कृषी विद्यापीठातूनच हे काम घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आता या वाणाला कृषी अनुसंधान परिषदेने मान्यता दिली असून दोन वर्षांत त्याखाली कापसाचे मोठे क्षेत्र येईल. माफक किंमतीत हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कमी कालावधीत तयार होणारा हा वाण रोग व किडीला प्रतिकारक आहे. त्यामुळे कीटकनाशकातील विषाचा वापर कमी होईल. उत्पादन खर्चही घटेल. संकरीकरणानंतर आपल्या कृषी विद्यापीठांत आता बीटी संशोधन सुरू करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. तेराशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कापूस बियाणाच्या बाजारपेठेत सार्वजनिक क्षेत्राचा शिरकाव होण्याची संधी केवळ त्यांच्या धडपडीमुळे मिळणार आहे. ज्यावेळी सर्वजण बीटीची कास धरत होते तेव्हा कृषी शात्रज्ञांना बरोबर घेवून  क्रांती यांनी वास्तवाचे भान आणले हे लक्षणीय.

सडेतोड मतांची मांडणी राजकीय नेतृत्वापुढे ते करत असतात. हे करताना दबावाला ते कधी बळी पडले नाहीत; पण कुठले भांडवल करत प्रसिद्धीही मिळविली नाही. गेली २८ वष्रे ते नागपूरला कापसावरच काम करतात. या संस्थेतच कपाशीच्या पानावर ठेवलेले मशीन झाडांत नत्र किती कमी आहे हे सांगते. तसेच काही संगणक प्रणालीही येथे विकसित झाल्या. कापूस म्हटले की, या संस्थेचे नाव जगभर घेतले जाते. देशातील कापूस शास्त्रज्ञांचे ते मार्गदर्शक आहेत. स्तोम न माजवता संशोधनाचे काम करता येते याची शिकवण त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घालून दिली. एप्रिलमध्ये ते अमेरिकेस जातील, परंतु नागपूर येथील संस्थेची घडी त्यांनी योग्य पद्धतीने बसविली असल्याने संशोधनावर परिणाम होणार नाही, असा आशावाद त्यांना आहे.

कृषी अनुसंधान परिषदेच्या ६१ संशोधन संस्था, १४ संशोधन केंद्रे, सहा राष्ट्रीय ब्युरो, ६२ कृषी विद्यापीठे व ६४२ कृषी विज्ञान केंद्रामधून काम करणाऱ्या २५ हजार कृषी शास्त्रज्ञांनी डॉ. क्रांती यांनी केलेल्या क्रांतिकारी कामातून प्रेरणा घेतली तर किमान कृषी क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांना फारसे महत्त्व उरणार नाही अन् शेतकरीही सुखी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:47 am

Web Title: keshav raj kranthi
Next Stories
1 प्रा. व्ही. कुमारन
2 श्याम जोशी
3 प्रा. ह्य़ूस्टन स्मिथ
Just Now!
X