कोरिअन सिनेमा म्हटले की अनेकांना मारधाडपटच आठवतील. परंतु लेखक-दिग्दर्शक किम की-डॉक यांनी तत्त्वज्ञानात्मक, कलात्मक सिनेमांचा प्रवाह गेल्या काही वर्षांत कोरिअन सिनेसृष्टीत निर्माण केला. प्रभावी दृश्यप्रतिमा आणि नैसर्गिक आवाजांच्या वापरावर भर देऊन त्यांनी स्वत:ची अशी चित्रभाषा तयार केली. त्यामुळे जागतिक स्तरावर किम की-डॉक यांची गणना महत्त्वाच्या दिग्दर्शकांमध्ये होऊ लागली. १९९६ ते २०२० या कालखंडात त्यांनी जवळपास ३३ सिनेमे केले. त्यांतील काहींची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन आणि संकलन असे सबकुछ किम की-डॉक यांचेच होते!

नव्वदच्या दशकात पटकथाकार म्हणून किम की-डॉक सिनेक्षेत्रात दाखल झाले अन् त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘क्रोकोडाइल’ हा पहिला सिनेमा १९९६ साली प्रदर्शित झाला. या किंवा यापुढच्याही किम यांच्या सिनेमांतील पात्रे कमी बोलतात; मात्र सिनेमांच्या कथेची मांडणी अतिशय आशयपूर्ण, दृश्यप्रतिमांनी संपन्न अशी असे. एकीकडे व्यावसायिक कोरिअन सिनेसृष्टीत मारधाड आणि शैलीदार चित्रपट बनत असताना, किम यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आपल्या सिनेमांतून मांडत स्वत:ची अनवट शैली निर्माण केली. किम यांच्याआधीही तत्त्वज्ञानात्मक, कलात्मक मांडणी असलेले कोरिअन सिनेमे बनत होतेच; मात्र किम यांनी त्यांच्या सिनेमांना वैश्विक आशय दिला. मानसिक, भावनिक आंदोलने प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सिनेमांमध्ये माणसांचे परस्पर संबंध, त्यांचे जगणे, निसर्ग यांविषयीचे तत्त्वज्ञान केंद्रस्थानी आहे. एकीकडे हे तत्त्वज्ञान वा बौद्ध विचार मांडतानाच, हिंसा हाही त्यांच्या सिनेमांतील महत्त्वाचा घटक दिसतो. विलक्षण अशा दृश्यप्रतिमांमधून प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यामुळेच तत्त्वज्ञानात्मक, कलात्मक सिनेमे करणाऱ्या आशियाई दिग्दर्शकांमध्ये किम हे अतिशय प्रभावी दिग्दर्शक ठरले. ‘थ्री आयर्न’, ‘समॅरिटन गर्ल’, ‘पिएता’, ‘वन ऑन वन’ असे उत्तमोत्तम सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले; पण २००३ मधील ‘स्प्रिंग, समर, फॉल, विण्टर.. अ‍ॅण्ड स्प्रिंग’ हा सिनेमा विशेष गाजला. प्रख्यात सिनेसमीक्षक रॉजर एबर्ट यांनी महान सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश केला होता. किम यांनी कान, व्हेनिस, बर्लिन अशा जागतिक पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिके पटकावली होती.

किम हे काही वेळा वादातही अडकले; पण अलीकडच्या काळात सिनेसृष्टीतील नव्या दमाच्या दिग्दर्शकांसाठी ते प्रेरणास्रोत राहिले. काही दिवसांपूर्वी किम यांना करोनाची बाधा झाली; त्यातच त्यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी- जन्मदिनाच्या (२० डिसेंबर) नऊ दिवस आधी- निधन झाले. त्यांच्या निधनाने कोरिअनच नव्हे, तर जागतिक स्तरावरील कलात्मक सिनेमांचा एक प्रवाहकर्ता काळाआड गेला आहे.