तब्बल सात दशके आणि ९० चित्रपटांमध्ये काम केलेले कर्क डग्लस परवा वयाच्या १०३ व्या वर्षी निवर्तले, ते एक अमीट वारसा मागे ठेवून. ‘स्पार्टाकस’ चित्रपटातील त्यांनी केलेली भूमिका हीच कदाचित आजच्या यू-टय़ूब पिढीच्या ऐकिवात किंवा पाहण्यातही आली असेल. पण त्यांच्या गाजलेल्या भूमिकांची यादी बरीच मोठी आहे. ‘चॅम्पियन’, ‘गन फाइट अ‍ॅट ओके कोराल’, ‘सेव्हन डेज इन मे’, ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’, ‘द वायकिंग्ज’, ‘आऊट ऑफ द पास्ट’, ‘द बॅड अ‍ॅण्ड द ब्युटिफुल’ ही नावे प्राधान्याने घेता येतील. पाच फूट नऊ इंच उंची म्हणजे हॉलीवूडच्या दृष्टीने तशी विजोड चण. पण कर्क कमालीचे देखणे होते. खळी पडलेली टोकदार हनुवटी, भेदक डोळे, सुबक चेहरा हे गुण त्यांना हॉलीवूडमध्ये वलय प्रदान करण्यासाठी पुरेसे होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ते रंगभूमीवर सक्रिय होते. एका रशियन निर्वासिताच्या पोटी जन्माला येऊनही त्यांनी अभिनयाचे क्षेत्र निवडले. त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, विविध चित्रपटांमध्ये गाजलेल्या भूमिका हे त्यांचे या क्षेत्रातले महत्त्वाचे योगदान नव्हे. उलट १९५० आणि ६०च्या दशकात साम्यवादाचा बागुलबुवा उभा केला जात असताना, डावीकडे झुकलेले अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ हॉलीवूडच्या तसेच बडय़ा चित्रपट स्टुडिओंच्या ‘काळ्या यादी’त फेकले गेले होते. त्यांना काम मिळेनासे झाले होते. अशांना काम देणाऱ्यांचीही काळ्या यादीत रवानगी व्हायची. परंतु राजकीय विचारसरणीपेक्षा गुणवत्तेवर, कौशल्यावर कर्क डग्लस यांचा विश्वास होता. अशा अनेक बहिष्कृत गुणीजनांना त्यांनी जवळ केले, काम दिले आणि यशही चाखले. त्या काळात हे मोठेच धाडस होते. पडद्यावर अनेक साहसी नायकांच्या भूमिका साकारणारे कर्क प्रत्यक्षात भित्रे होते, हे ते स्वत:च मिश्कीलपणे सांगत. पण त्यांचे खरे धाडस पाहता हा दावा फारच विनयशील ठरतो. विनोदाची जाण हा त्यांचा आणखी एक पैलू. अर्धागवायू आणि म्हातारपणाने शरीर पोखरल्यावर कंटाळून एकदा पिस्तूल गालाला लावले. ते नेमके दातांवर आपटले आणि कळवळलो. मग तो विचारच सोडून दिला, अशी आठवण त्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितली होती. १९९६ मध्ये अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसने त्यांना जीवनगौरवपर ‘ऑस्कर’ दिले. तरुण असतानाच त्यांनी अमेरिकेतील वृद्धांसाठी आसरा निर्माण करणारी संस्था उभी केली होती. त्यांचा मुलगा मायकेल डग्लस हाही उत्तम अभिनेता. मात्र निव्वळ अभिनयापलीकडे प्रसंगी खंबीर भूमिका घेणारे आणि अखेपर्यंत मिश्कीलीशी प्रतारणा न घेणारे ही कर्क यांची ओळखही ठळक ठरली.